जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:19 AM2019-10-20T02:19:18+5:302019-10-20T02:19:22+5:30
सीमा सुरक्षादलाच्या तक्रारीनंतर कारवाई
कोलकाता : सीमा सुरक्षादलाने (बीएसएफ) एका जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध (बीजीबी) पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यात अन्य एक जवान जखमी झाला आहे.
बॉर्डर गार्ड बांगलादेशने गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर फ्लॅग मीटिंगदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाची गोळी मारून हत्या केली होती. मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव विजय भान सिंह (५१), असे आहे. या गोळीबारात अन्य एक जवान राजवीर यादव जखमी झाला होता.
सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे की, ही घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सकाळी ९ वाजता घडली होती. भारताच्या सुरक्षा दलाने भारतीय मच्छीमारांसंबंधी मुद्यावर चर्चा करण्यासाठी नदी किनारी उभ्या असलेल्या बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या जवानांशी संपर्क केला होता. याचवेळी ही घटना घडली. मुर्शिदाबादचे पोलीस अधीक्षक मुकेश कुमार यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाकडून तक्रार मिळाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या जवानांनी स्वसुरक्षेसाठी गोळी झाडली, असा दावा बांगलादेशच्या बॉर्डर गार्डने केला असला तरी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे. भारताकडून एकही गोळी चालविण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
द्विपक्षीय संबंधांवर परिणाम नाही
कोलकाता : बॉर्डर गार्डस बांगलादेशने (बीजीबी) बीएसएफच्या एका जवानाला ठार मारल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी म्हटले आहे की, व्दिपक्षीय संबंधांवर या घटनेचा परिणाम होणार नाही.गरज पडल्यास परिस्थिती शांत करण्यासाठी आपण भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करु, तसेच, बांग्लादेशच्या जलक्षेत्रात पकडण्यात आलेल्या मच्छिमारांची नियमानुसार सुटका करण्यात येईल.
दरम्यान, जवानाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना होती आणि महासंचालक स्तरावरील चर्चेत हा प्रश्न सोडवू. अशा प्रकारचे प्रश्न दोन्ही देशातील बैठकीत सोडविले जायला हवेत. दोन देशातील संबंध चांगले असून ते पुढेही राहतील.