हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणाऱ्या नऊ आमदारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:34 AM2021-03-17T06:34:14+5:302021-03-17T06:35:14+5:30

शिरोमणी अकाली दलाचे आमदार शरणजित सिंह ढिल्लों, विक्रमसिंह मजीठिया, बलदेवसिंह खैरा, सुखविंदर कुमार, हरिन्दरपालसिंह चंदूमाजरा, कंवरजितसिंह बारकंडी, मनप्रीतसिंह अयाली, गुरप्रतापसिंह वडाला व एन. के. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against nine MLAs for besieging Haryana Chief Minister | हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणाऱ्या नऊ आमदारांवर गुन्हा

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणाऱ्या नऊ आमदारांवर गुन्हा

Next

चंडीगढ : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मागील आठवड्यात विधानसभेबाहेर घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यावरून चंडीगढ पोलिसांनी पंजाबच्या शिरोमणी अकाली दलाच्या नऊ आमदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Crime against nine MLAs for besieging Haryana Chief Minister)

शिरोमणी अकाली दलाचे आमदार शरणजित सिंह ढिल्लों, विक्रमसिंह मजीठिया, बलदेवसिंह खैरा, सुखविंदर कुमार, हरिन्दरपालसिंह चंदूमाजरा, कंवरजितसिंह बारकंडी, मनप्रीतसिंह अयाली, गुरप्रतापसिंह वडाला व एन. के. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलाने हा प्रकार दुर्भाग्यपूर्ण व लोकशाहीच्या विरोधातील असल्याचे म्हटले आहे. चंडीगढ पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम १८६ (लोकप्रतिनिधीला सरकारी कामकाज करण्यात अडथळा आणणे), ३२३ (हेतुपुरस्सरपणे जखम करणे) व ३४१ (बेकायदेशीररीत्या रोखणे) आदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


१० मार्च रोजी ‘शिअद’च्या आमदारांनी विधानसभा हॉलबाहेर खट्टर यांना घेराव घातला होता व नवीन कृषी कायद्याच्या विरोधात विधानसभेत एक प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. या प्रकारानंतर हरियाणा विधानसभा सचिवालयाने खट्टर यांच्याशी असभ्य वर्तन केल्यावरून पंजाबच्या या आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे गृहसचिव राजीव अरोरा व पोलीसप्रमुख मनोज यादव यांच्यासमवेतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुप्ता यांनी सोमवारी (दि. १५) या घटनेचा निषेध केला व ‘शिअद’ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला; तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. गुप्ता यांनी दूरध्वनीवरून पंजाब विधानसभा अध्यक्ष के. पी. सिंह यांच्याशी चर्चाही केली व त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, असा आग्रहही केला.

गुन्हा दाखल करणे दुर्भाग्यपूर्ण - दलजितसिंह चीमा  
- शिरोमणी अकाली दलाचे नेते व माजी मंत्री दलजितसिंह चीमा यांनी नऊ आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे पाऊल दुर्भाग्यपूर्ण व लोकशाहीच्या विरोधात असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी विधानसभेच्या बाहेर खट्टर यांच्याविरोधात निदर्शने केली होती.
 

Web Title: Crime against nine MLAs for besieging Haryana Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.