पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; नित्यानंद आश्रमातील मुलांना अश्लील चित्रे दाखविल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 01:40 AM2020-03-10T01:40:38+5:302020-03-10T01:40:58+5:30
नित्यानंद यांच्या आश्रमातील बालकांना अश्लील साहित्य दाखविल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबाद : स्वयंघोषित स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध दाखल अपहरणाच्या गुन्ह्यांची चौकशी करणाºया पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध पॉक्सो कायद्यातहत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा मार्च रोजी विशेष कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नित्यानंद यांच्या आश्रमातील बालकांना अश्लील साहित्य दाखविल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात बालकल्याण समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे. नित्यानंद यांचे शिष्य गिरीश तुरलापती यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. स्वामी नित्यानंद यांचा अहमदाबादलगतच्या हिरापूर येथे गुरुकुल-आश्रम आहे. विवेकानंदनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. तुरलापतीने याचिकेत पोलीस निरीक्षक आर. बी. राणा यांच्यासह पोलीस अधिकारी, बालकल्याण समितीच्या सदस्यांविरुद्ध असा आरोप केला की, त्यांनी आश्रमातील बालकांना उद्वेगजनक प्रश्न विचारले. चौकशी अधिकाºयांनी मानसिक छळ केला. तसेच मुलींसह मुलांना अश्लील चलचित्रे आणि छायाचित्रे दाखविली.
हे आहेत आरोपी...
आरोपींमध्ये पोलीस निरीक्षक राणा, उपाधीक्षक के. टी. कामरिया, रियाज सरवैया, एस. एच. शारदा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप मेर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष भावेश पटेल आणि समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. तक्रारदाराचा जबाब नोंदविण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे, असे पोलीस उपधीक्षक (अहमदाबाद ग्रामीण) पी. डी. मन्वर यांनी सांगितले.