‘अॅम्नेस्टी’विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा
By admin | Published: August 17, 2016 04:37 AM2016-08-17T04:37:08+5:302016-08-17T04:37:08+5:30
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या कार्यक्रमात स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्यानंतर पोलिसांनी इथे गुन्हा नोंदविला
बंगळुरू : अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या कार्यक्रमात स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्यानंतर पोलिसांनी इथे गुन्हा नोंदविला असून, त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेविरुद्ध येथे देशद्रोहासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅम्नेस्टीने युनायटेड थिओलॉजिकल कॉलेजमध्ये सोमवारी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात एका काश्मिरी नेत्याने भारतीय लष्कराची प्रशंसा केली. चर्चासत्राला उपस्थित स्वतंत्र काश्मीरसमर्थकांना ते रुचले नाही, त्यामुळे त्यांनी या नेत्याशी वाद घालत स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चर्चासत्राच्या आयोजनामागील हेतू आणि पार्श्वभूमीची चौकशी करण्यात येईल, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी काल म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला राष्ट्रविरोधी संबोधून रविवारी निदर्शने केली. त्यांनी चर्चासत्राच्या व्हिडीओ चित्रीकरणासह पोलिसांत तक्रार दिली आहे. (वृत्तसंस्था)