सीबीआयचा स्वत:च्याच विशेष संचालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:20 AM2018-10-22T06:20:18+5:302018-10-22T06:20:32+5:30
केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) या देशातील अग्रगण्य तपास यंत्रणेतील वरिष्ठांमधील सुंदोपसुंदी शिगेला पोहोचली
नवी दिल्ली: केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) या देशातील अग्रगण्य तपास यंत्रणेतील वरिष्ठांमधील सुंदोपसुंदी शिगेला पोहोचली असून, त्यातून या संस्थेने एका भ्रष्टाचार प्रकरणात आपलेच विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ‘सीबीआय’च्या सहा दशकांच्या इतिहासात ही ‘न भूतो’ अशी घटना आहे.
‘सीबीआय’मध्ये संचालक आलोक वर्मा यांच्यानंतर विशेष संचालक अस्थाना हे दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत. अस्थाना हे भारतीय पोलीस सेवेच्या १९८४च्या तुकडीतील गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत. मनी लॉड्रिंग आणि लाचखोरीसह अनेक खटले सुरू असलेला कर्नाटकमधील प्रमुख मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अस्थाना यांच्यावर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘सीबीआय’ने हे अधिकृतपणे जाहीर केले नसले, तरी त्या संस्थेतील व सरकारमधील माहितगार सूत्रांनी त्यास दुजोरा दिला.
सू^त्रांनुसार काही दिवसांपूर्वी ‘सीबीआय’ने मनोज कुमार या मध्यस्थाला अटक केली. या मनोज कुमारने कुरेशीच्या वतीने अस्थाना यांना दोन कोेटी रुपयांची लाच दिल्याचा कबुलीजबाब दंडाधिकाºयांसमक्ष नोंदविल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लाचखोरीच्या प्रकरणात अस्थाना यांचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी बडोदा येथील संदेसरा या व्यापारी बंधूंना मदत केल्याच्या संदर्भात अस्थानांवर संशयाची सुई वळली होती. बँकांची ५,२०० कोटी रुपयांची कर्जे बुडवून हे संदोसरा बंधू परदेशात फरार झाले असून त्यांच्यावर ‘सीबीआय’ व ‘ईडी’या दोन्ही तपासी यंत्रणांनी गुन्हे नोंदविलेले आहेत.