तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:30 AM2024-09-22T07:30:01+5:302024-09-22T07:30:18+5:30
कंपनीची सायबर पोलिसांकडे तक्रार
तिरूपती/अहमदाबाद : आंध्र प्रदेशातील तिरूपती येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील लाडूसाठी वापरलेले भेसळयुक्त तूप ‘अमूल’ ब्रँडचे होते, अशी अफवा पसरवणाऱ्या सात ‘एक्स’ वापरकर्त्यांविरुद्ध शनिवारी अहमदाबादेत गुन्हा दाखल केला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी भगवान बालाजीच्या लाडूच्या वादाला तोंड फोडले आहे. आधीच्या सरकारच्या काळात लाडूसाठी जनावरांची चरबी असलेले तूप वापरण्यात येत होते, असा आरोप नायडू यांनी प्रयोगशाळांतील अहवालांच्या हवाल्याने केला आहे. त्यातच ‘लाडूंसाठी वापरण्यात आलेले हे बनावट तूप गुजरातच्या आणंद येथील ‘गुजरात सहकारी दूध विपणन महासंघा’च्या अमूल ब्रँडचे होते,’ अशा आशयाच्या पोस्ट ‘एक्स’वर व्हायरल झाल्या. यांतील सातजणांविरोधात ‘जीसीएमएमएफ’च्या तक्रारीनंतर अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने एफआयआर नोंदवला आहे.
‘तिरूपतीच्या लाडूला पुन्हा पावित्र्य बहाल’
दरम्यान, तिरूपतीच्या प्रसिद्ध ‘लाडू प्रसादम्’ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले आहे, असे तिरूमला तिरूपती देवस्थानमने (टीटीडी) म्हटले आहे.
टीटीडीने एका समाजमाध्यम पोस्टमध्ये म्हटले की, ‘श्रीवारी लाडूची दिव्यता आणि पावित्र्य आता निर्विवाद आहे. सर्व भक्तांच्या समाधानासाठी लाडू प्रसादम्चे पावित्र्य कायम राखण्यासाठी देवस्थान वचनबद्ध आहे.’
भाजपची जगन यांच्यावर टीका
अमरावती : भाजपाचे आंध्र प्रदेशातील नेते एल. दिनाकर यांनी युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीचे (वायएसआरसीपी) अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दिनाकर यांनी म्हटले की, रेड्डी यांना सरकारी खजिना लुटणे आणि हिंदू रीतिरिवाज व परंपरा यांना कलंकित करणे यांशिवाय दुसरे कोणतेही ज्ञान नाही. एकूणच या प्रकरणावरून सुरु झालेले वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.