Crime: हनिट्रॅप! बायकांचा नाद आजोबांना पडला भारी, गमावले लाखो रुपये, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 08:07 PM2023-08-16T20:07:39+5:302023-08-16T20:08:44+5:30
Crime News: एका आजोबांना बायकांचा नाद चांगलाच महागात पडला. या वृद्धाने हनिट्रॅपमध्ये अडकून तब्बल ८२ लाख रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बंगळुरूमध्ये एका आजोबांना बायकांचा नाद चांगलाच महागात पडला. या वृद्धाने हनिट्रॅपमध्ये अडकून तब्बल ८२ लाख रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील एका ६० वर्षीय वृद्धाला हनिट्रॅपमध्ये अकडून त्याच्याकडून लाखो रुपये उकण्यात आले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर जयनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींची ओळख रीना अनम्मा, ३० वर्षांची स्नेहा आणि स्नेहाचा पती लोकेश अशी आहे.
पोलिसांकडे तक्रार दाखल करताना पीडित वृद्धाने सांगितले की, माझ्या काही मित्रांनी एप्रिल-२०२३ अनम्मा हिच्याशी त्यांची ओळख करून दिली. माझ्या मित्रांनी सांगितले की, अनम्माच्या ५ वर्षांच्या मुलाला कॅन्सर आहे. तसेच मी तिला मदत करावी, असे सुचवले. त्यानंतर अनम्मा मला भेटली तेव्हा मी तिला पाच हजार रुपये दिले. त्यानंतर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने अनम्मा मला भेटत राहिली. तसेच आजारपणाचा बहाणा करून पैसे उकळले.
त्यांनी तक्रारीमध्ये पुढे सांगितले की, त्यानंतर अनम्मा मला हुस्कूर गेटजवळच्या हॉटेलमध्ये भेटली. तसेच तिने माझ्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमच्यामध्ये संबंधही प्रस्थापित झाले. एकदोन वेळा माझ्यासोबत राहिल्यानंतर तिने तिच्या स्नेहा नावाच्या मैत्रिणीशी भेट घालून दिली. नंतर स्नेहाही माझ्याकडे पैसे मागू लागली. तर अनम्मानेही माझ्याकडे पैशांचा तगादा लावला. तसेच पैसे न दिल्यास प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली. तसेच हळूहळू या दोघींनी अश्लील व्हिडीओ नातेवाईकांना न पाठवण्यासाठी माझ्याकडे ७५ लाख रुपयांची मागणी केली.
पीडित वृद्धाने पुढे सांगितले की, मी माझ्या प्रॉव्हिडंट फंडमधून ८२ लाख रुपये काढून अनप्पाच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले. त्यानंतर मी ही गोष्ट कुणाला सांगितली, तर माझ्या मुलीवर बलात्कार करवण्याची धमकी दिली. काही दिवसांनंतर या दोघींनी आणखी ४२ लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळेच मी पोलिसांकडे धाव घेतली, असे पीडित वृद्धाने सांगितले.