Crime: आमदाराच्या पुतण्याची गुंडगिरी, महिलेला केली शिविगाळ, मग मारले चाबकाचे फटके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:16 AM2023-06-17T11:16:51+5:302023-06-17T11:17:47+5:30
Bihar Crime News: बिहारमध्ये पुन्हा एकदा बळ आणि सत्तेचा माज दाखवून देणारी घटना घडली आहे. ही घटना खगडिया जिल्ह्यातील असून, येथे जेडीयू आमदाराच्या पुतण्याने सत्तेचा माज दाखवत एका महिलेला शिविगाळ करत चाबकाने मारहाण केली.
बिहारमध्ये पुन्हा एकदा बळ आणि सत्तेचा माज दाखवून देणारी घटना घडली आहे. ही घटना खगडिया जिल्ह्यातील असून, येथे जेडीयू आमदाराच्या पुतण्याने सत्तेचा माज दाखवत एका महिलेला शिविगाळ करत चाबकाने मारहाण केली. आमदाराच्या पुतण्याने केलेल्या या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ बेलदोर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पनसलबा गावातील आहे. येथे एका महिलेला काही तरुण बेदम मारहाणा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे तरुण महिलेला हंटरने वारंवार मारहाण करताना दिसत आहेत. तसेच त्या महिलेला गाव सोडून जाण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच या दरम्यान त्या महिलेला शिविगाळही करताना हे तरुण दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असलेला एक तरुण हा बेलदोरचे जेडीयू आमदार पन्नालाल पटेल यांचा पुतण्या अक्षय पटेल असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला ही उत्तर प्रदेशमधील राहणारी आहे. तसेच गावातीलच एक तरुण लग्न करण्यासाठी तिला खगडिया येथे घेऊन आला होता. काही महिन्यानंतर महिलेचा पती मोलमजुरी करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. त्यानंतर ही महिला गावात एकटीच राहत होती. आता या महिलेला नेमकी मारहाण का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. या तपासानंतरच या घटनेमागचं खरं कारण समोर येणार आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खगडियाचे एसपी अमितेश कुमार यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी या व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणाची ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिलेचाही शोध घेतला जात आहे. जर महिलेने तक्रार दिली नाही तर पोलिसांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला जाईल.