मोदी-राजे कुटुंबात गुन्हेगारी साटेलोटे
By admin | Published: July 1, 2015 02:40 AM2015-07-01T02:40:29+5:302015-07-01T02:40:29+5:30
धौलपूर राजमहालाचा वाद आणखी चिघळला असून काँग्रेसने मंगळवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकत त्यांच्या बडतर्फीच्या
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
धौलपूर राजमहालाचा वाद आणखी चिघळला असून काँग्रेसने मंगळवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकत त्यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी दबाव वाढविला आहे. राजे कुटुंब आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यात गुन्हेगारी साटेलोटे असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीने मात्र हा आरोप फेटाळला आहे.
दरम्यान, तपास संस्था याप्रकरणी काय कारवाई करीत आहे याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंग यांनी देशाला द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कागदपत्रे सादर करीत केली.
इ.स. १९४९ पासूनचे सर्व रेकॉर्ड सादर करून धौलपूर राजमहाल सरकारी होता आणि आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
काँग्रेसने ललित मोदी आणि राजे मायलेकात असलेल्या व्यावसायिक हितसंबंधांचा ऊहापोह करताना सांगितले की, संपत्तीची लयलूट करण्याच्या हेतूने या त्रिकुटाच्या साट्यालोट्यातूनच कोट्यवधीचा राजमहाल हडपून तेथे पंचतारांकित हॉटेल बांधण्यात आले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा ढोल बडविणारे ५६ इंची छातीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कार्यवाही तर दूरच मौनही तोडण्याचे सौजन्य दाखविले नाही. उलट ते आपल्या भ्रष्ट मंत्र्याच्या बचावाचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काँग्रेस कदापि असे होऊ देणार नाही, असा निर्धार जयराम रमेश यांनी जारी केला.
संगनमताने लाखो हडप
दुष्यंतसिंग यांच्यावर भूसंपादन अधिकाऱ्याच्या संगनमताने शासकीय जमीन मालकीची दाखवून मोबदल्याच्या रूपात १,९७,२१,७२० रुपये हडपल्याचा आरोपही काँग्रेसने केला. भरतपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी १७ मे २००७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार हेमंतसिंग व दुष्यंतसिंग यांच्यातील समझोत्याअंतर्गत केवळ धौलपूर सिटी पॅलेसच्या स्थायी संपत्तीचा हक्क वसुंधरा यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांना देण्यात आला होता.