Crime News: बाप रे... रातोरात 60 फूट लांब पूल चोरीला, अभियंत्याची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:01 AM2022-04-07T10:01:19+5:302022-04-07T10:04:07+5:30
भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे
रोहतास - बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या नासरीगंज तालुक्यातील आमियावर स्थित एक लोखंडी पुलच रातोरात गायब झाला आहे. 60 फूट लांब, 10 फूट चौरस आणि 12 फूट उंच असलेला हा पूल अज्ञाताने जेसीबीच्या सहाय्याने पळवून नेला आहे. सोमवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने येथील लोखंडी पूल काढून वाहनातून पळवून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या चोरीची प्रशासन आणि जलसंधारण विभागाला भनकही लागली नाही.
भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन नहर परिमंडळातील आमियावर स्थित एका प्रमुख बंधाऱ्यावर असलेल्या काँक्रिटला समांतर एक जुना पुला होता. विशेष म्हणजे हा पुल 25 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हा लोखंडी पूलच गायब झाला आहे. यापूर्वीही पुलाच्या काही भागाचे लोखंड अनेकांनी पिकअप वाहनातून पळवले होते.
सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने हा पुल उखाडण्यात आला. त्यावेळी, हा पुल कोणाच्या आदेशाने काढण्यात येत असल्याची विचारणा ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी, जेसीबी चालकांनी आपण जलसंधारण विभागाचं काम करत असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत या पुलातून अंदाजे 20 टनापेक्षा अधिक लोखंड काढण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याच्या निर्मित्तीअगोदर नावेतून गावातील लोक ये-जा होत होती. सन 1966 मध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी होवून अपघात झाला. त्यानंतर, सन 1972 ते 75 या कालावधीत तत्कालीन सरकारने हा पूल बांधला होता. मात्र, हा पुल कमकवूत झाल्यानंतर यास समांतर सीमेंट काँक्रिटचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे, या पुलावरुन वाहतूक कमी झाली होती.