Crime News: गुगलवर कॉल गर्ल सर्च करणं पडलं महागात, सगळं अंगलटच आलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 01:22 PM2022-02-18T13:22:00+5:302022-02-18T13:32:26+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय युवक कुटुंबासमवेत पश्चिम विहार येथे राहतो. तो सॅनिटायजरशी संबंधित व्यवसायही करतो.
नवी दिल्ली - इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. दिल्लीतील एका युवकाला ही गोष्ट चांगलाच मार खाऊन आणि नुकसान झेलून लक्षात आली. ऑनलाईन 'कॉल गर्ल' सर्च केल्यानंतर हा तरुण अडचणीत सापडला. व्हिडिओ कॉल करुन मुलीने भेटायला बोलावले, त्यावेळी सोबतच्या मित्रांकडून या युवकाला मारहाण करत त्याच्याकडील 3 हजार रुपये काढून घेतले. तसेच, युवकाच्या बँक खात्यातील 30 हजार रुपयेही ट्रान्सफर करुन घेतले. याप्रकरणी अमन विहार पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय युवक कुटुंबासमवेत पश्चिम विहार येथे राहतो. तो सॅनिटायजरशी संबंधित व्यवसायही करतो. दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास त्याने गुगलवर कॉल गर्ल्स असे सर्च केले. त्यावेळी, एका मुलीचा मोबाईल नंबर मिळाला. मुलीसोबत फोनवर संवाद झाल्यानंतर, काहीवेळातच मुलीने व्हिडिओ कॉल करुन रोहिणी सेक्टर-22 येथे भेटण्यास बोलावले. त्याप्रमाणे तो युवक 2 वाजता तेथे पोहोचला, पण मुलीने प्रेम नगर येथे येण्याचे सांगितले. त्यानुसार, युवक तेथे पोहोचला, पण युवतीने पुन्हा पीरबाबा येथील जागेवर बोलावले. काही वेळात युवतीही तेथे आली. त्यानंतर, तरुणाला बाईकवर घेऊन ती पॉकेट-13 येथे घेऊन आली.
मुलीने या बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये युवकासे नेले. युवतीने कुणालातरी व्हॉट्सअप कॉल केला आणि काही वेळातच तेथे एक मुलगी आणि दोन युवक आले. या चौघांनी मिळून युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, युवकाच्या पॉकेटमधून 3 हजार रुपयेही काढून घेतले. जर जीव वाचवायचा असेल, तर अकाऊंटमध्ये 50 हजार रुपये ट्रान्सफर कर, अशी धमकीही दिली.
दरम्यान, मुलीच्या धमकीनंतर युवकाने वडिलांना फोन केला, त्यावेळी त्यांनी 30 हजार रुपये मुलीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर, या चौघांनी धक्के मारत युवकाला फ्लॅटमधून हाकलून दिले.