बापरे! खोकल्यावर दुकानदाराने कोरोना आहे का? विचारलं; संतापलेल्या 'त्याने' डोकंच फोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 04:18 PM2021-10-26T16:18:26+5:302021-10-26T16:20:24+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 356 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खोकल्यावर दुकानदाराने कोरोना आहे का? असं विचारलं म्हणून संतापलेल्या एका व्यक्तीने त्याचं डोकंच फोडल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. दुकानात आलेल्या एका ग्राहकाला खोकला आला. त्यावर दुकानदाराने त्याला कोरोना आहे का? असा प्रश्न विचारला. यानंतर रागावलेल्या व्यक्तीने थेट दुकानदाराचं डोकं फोडल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि कुटुंबीयांनी दुकानदाराला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.
लोखंडी रॉडने केली मारहाण
विपिन असं दुकानदाराचं नाव आहे. तर दोन जणांनी त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपींमध्ये वसीम अहमद आणि अबरार या दोघांचा समावेश आहे. विपिन याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे काका प्रमोद यांचं बाजारात एक कपड्याचं दुकान आहे. तो आपल्या काकांच्या दुकानात काम करतो. त्याच दरम्यान आरोपी दुकानात आला आणि खोकू लागला. तेव्हा विपिनने त्याला कोरोना आहे का? असं विचारलं. त्यानंतर तो संतापला आणि त्याने वाद घालायला सुरुवात केली. तसेच रॉडने मारहाण केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.