खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वृद्ध आई-वडिलांना केली मारहाण, तलवार दाखवत म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:36 IST2025-02-15T12:35:16+5:302025-02-15T12:36:21+5:30
Crime News: आई-वडील आणि मुलग्याच्या नात्याला कलंक लावणारी अत्यंत धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथून समोर आली आहे. येथे एका मुलाने वृद्ध आई-वडीलांनी घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बेदम मारहाण केली.

खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वृद्ध आई-वडिलांना केली मारहाण, तलवार दाखवत म्हणाला....
आई-वडील आणि मुलग्याच्या नात्याला कलंक लावणारी अत्यंत धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथून समोर आली आहे. येथे एका मुलाने वृद्ध आई-वडीलांनी घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर घरातील तलवार दाखवत हातपाय तोडण्याची धमकी दिली. दरम्यान, वडिलांनी वेजलपुर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना अहमदाबादमधील जुहापुरा येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या एका ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीने वेजलपूर पोलिस ठाण्यात आपल्या मुलाविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पीडित वृद्ध गृहस्थांचा ४० वर्षांचा मुलगा, त्याची पत्नी आणि तीन मुलांसह घरातील वरच्या मजल्यावर राहतो. तर सदर वृद्ध गृहस्थ घराबाहेर एक छोटंसं दुकान चालवून कुटुंबाचं पालन पोषण करतात.
दरम्यान, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या वृद्धाच्या मुलाने आईकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. तेव्हा आईने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकून आरोपी मुलाने आईसोबत भांडण करायला सुरुवात केली. तसेच शिविगाळ करून मारहाण केली. आईने आरडा ओरडा केल्यावर वृद्ध वडील तिथे आले, तेव्हा मुलाने त्यांच्याशीही भांडण्यास सुरुवात केली.
एवढंच नाही तर त्याने घरात ठेवलेली तलवार बाहेर आणली. तसेच तलवारीचा धाक दाखवून वृद्ध माता पित्याला धमकावण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर हात पाय तोडेन अशी धमकी त्याने आई-वडिलांना दिली. त्यानंतर आई वडिलांनी पोलीस कंट्रोलला फोन करून मदत मागितली. तेव्हा आरोपी घरातून फरार झाला. आका अहमदाबादमधील वेजलपूर पोलिसांनी आई वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.