एकाच शहरात 2 पत्नींसोबत राहत होता तरुण; सत्य समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:03 PM2022-01-06T13:03:22+5:302022-01-06T13:09:54+5:30
Crime News : तरुण त्याच्या दोन पत्नींसह वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो वेळ काढून दोघींकडे जायचा. मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना याबाबत जराही कल्पना नव्हती.
नवी दिल्ली - हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात एका तरुणाने दोन लग्न केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला नाही. तरीही हा तरुण त्याच्या दोन पत्नींसह वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो वेळ काढून दोघींकडे जायचा. मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना याबाबत जराही कल्पना नव्हती. तरुणाला दोन्ही पत्नींपासून मुलेही आहेत. मात्र पहिल्या पत्नीने तिला संशय आल्य़ावर आता त्याची पोलखोल केली आहे. त्याला पकडल्यानंतर आता आरोपी पती तिला जीवे मारण्याची धमकी देत आहे.
पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तिने मुरथळ येथील एका सोसायटीत राहत असल्याचं म्हटलं आहे. 2004 मध्ये रवींद्र मान याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. बरेच दिवस दोघंही मुलीसोबत सुखाने राहत होते. मात्र काही दिवसांपासून पीडितेनं सांगितले की, तिच्या पतीने तिला वेळ देणं बंद केलं होतं. तो कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडत असे. तिला संशय आल्यावर ती एके दिवशी तिच्या पतीच्या मागे गेली. तिनं त्याचा पाठलाग केला.
संशयानंतर बिंग फुटलं; अशी झाली पोलखोल
पाठलाग करताना ती सेक्टर-23 मध्ये पोहोचली, तिथे तिचा पती आणि दुसरी महिला आढळून आली. याबाबत तिने चौकशी केली असता ती त्याची दुसरी पत्नी असल्याचं समोर आलं. जिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत. जे शहरातील खासगी शाळेत शिकतात. मुलाच्या वडिलांचं नाव रवींद्र असे लिहिल्याची माहिती शाळेकडून मिळाली. या संदर्भात तिने पती रवींद्र याला विचारलं असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे ठोस पुरावे समोर ठेवताच तो तिला धमक्या देऊ लागला.
पतीला माझी आणि मुलीची हत्या करायची असल्याचा पीडितेचा आरोप
पतीला माझी आणि मुलीची हत्या करायची असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षकांना देण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून मुरथळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच आरोपीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.