लग्नानंतर 6 महिन्यांनी 'ती' सासरी आली अन् पतीचा काढला काटा; बॉयफ्रेंडच्या मदतीने असा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:23 PM2021-12-23T12:23:42+5:302021-12-23T12:24:27+5:30
Crime News : तरुणाच्या पत्नीवर हत्येचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीला मारल्याचं म्हटलं जात आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान बिहारच्या जमुईमध्ये 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाच्या पत्नीवर हत्येचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीला मारल्याचं म्हटलं जात आहे. जिल्ह्यातील चंद्रदीप पोलीस स्टेशन हद्दीतील सांपो गावात ही घटना घड़ली आहे. तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. सांपो गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
विकास कुमार असं तरुणाचं नाव आहे. मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मृताची पत्नी काजल कुमारी हिने बॉयफ्रेंडला फोन करून पतीची ओळख करुन दिली होती आणि बॉयफ्रेंडच्या मदतीनेच माझ्या भावाची हत्या करण्यात आली. लग्नानंतर 10 डिसेंबर रोजी पत्नी तिच्या माहेरून सासरच्या घरी आली होती. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मंगळवारी संध्याकाळी विकास कुमार उर्फ विकीला कोणीतरी फोनकरुन घराबाहेर मोटरसायकल दुरुस्त करण्यासाठी बोलावलं होतं.
विकास त्यानंतर घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी गावभर त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. यानंतर सकाळी गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मृतदेह दिसला. मृत विकास उर्फ विकीची पत्नी काजल कुमारी देखील घटनास्थळी पोहोचली असता तिला पाहून गावकरी संतप्त झाले. लोकांनीही या हत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले. तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पत्नी काजल कुमारीने शेखपुरा जिल्ह्यातील दिघापर गावातील एका तरुणाला बोलावलं होतं. त्यानंतर मृताच्या पत्नीने तो तरुण आपला भाऊ असल्याचं सासऱ्याच्या लोकांना सांगितलं होतं.
विकासची पत्नी काजल कुमारीनं त्या तरुणाला पतीची ओळख पटवून देण्यासाठीच त्याला बोलावलं होतं आणि याच तरुणानं हत्येची घटना घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी एसडीपीओ डॉ राकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून, तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून पत्नीने पतीची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. सध्या तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.