Crime News:आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण, भाजप नेत्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:03 AM2022-04-25T11:03:06+5:302022-04-25T11:05:03+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 84 सी नुसार तक्रार दाखल केली होती
मंगळुरू - येथील एका आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याप्रकरणी एका भाजप नेत्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलथांगडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संतोष, संदीप, लोकैया, गुलाबी, कुसूमा, सगुना, अनिल, ललिता, आणि चेन्नोकेशव अशी आरोपींची नावे आहेत. बेलथांगडी तालुक्यातील गुरीपल्ला येथे 19 एप्रिल रोजी काही ग्रामस्थांसमोर ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 84 सी नुसार तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महसूल अधिकार सरकारी जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी गावात पोहोचले. त्यावेळी, संशियत आरोपींनी गोंधळ केला. तसेच, संबंधित अधिकाऱ्याला काम सोडून निघून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर, तक्रारदाराच्या मोठ्या बहिणीला मारहाण केली. त्यामुळे, पीडित महिला बहिणीच्या मदतीसाठी पोहचली असता, तिचे कपडे फाडून तिला मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे या लोकांनी घटनेचा व्हिडिओही बनवला होता. सध्या बेलथांगडी पोलिसांनी खटला दाखल केला असून तपास सुरू आहे.
दरम्यान, धर्मस्थलजवळ एका आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर माजी मंत्री बीटी ललिता नाईक यांनी नाराजी दर्शवली. तसेच, धर्मस्थलचे अधिकारी विरेंद्र हेगडे या प्रकरणावर गप्प का आहेत? असा सवालही नाईक यांनी विचारला. धर्मस्थळ आणि तिरुपती यांसारखे पवित्र तिर्थक्षेत्र केवळ डोकं मुंडविण्यासाठीच आणि प्रसाद घेण्यासाठीच आहेत का?. या धर्मस्थळांनी अशा घटनांमधील पीडितांचे सांत्वन करुन किमान शिष्टाचार तरी दाखवून द्यायला हवा, असेही नाईक यांनी म्हटले.