दारुबंदीमुळे बिहारमधील गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला
By Admin | Published: April 28, 2016 12:31 PM2016-04-28T12:31:09+5:302016-04-28T12:45:29+5:30
बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारुबंदीमुळे गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला आहे, तर सोबतच अपघातांच प्रमाणही कमी झालं आहे
>ऑनलाइन लोकमत -
पाटणा, दि. 28 - बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारुबंदीमुळे गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला आहे. तर सोबतच अपघातांच प्रमाणही कमी झालं आहे. गेल्या 20 दिवसांत समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे अधिका-यांनी ही माहिती दिली आहे. 5 एप्रिलपासून राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. राज्यात लागू करण्यात आलेल्या दारुबंदीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला असून रस्ते अपघाताचं प्रमाण 33 टक्क्यांनी कमी झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच पार पडलेल्या बैठकीत ही अधिकृत आकडेवारी मांडण्यात आली. आकडेवारीनुसार गतवर्षी 1 एप्रिल ते 23 एप्रिलदरम्यान गुन्हेगारीच्या 3178 घटनांची नोंद झाली होती. मात्र दारुबंदी लागू करण्यात आल्यापासून हा गुन्हेगारी दर घसरला असून यावर्षी 2528 घटनांची नोंद झाली आहे.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणा-या दंगलींच्या घटनांचं प्रमाणही कमी झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारुबंदी पूर्णपणे लागू राहील याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जे अधिकारी निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासही सांगितलं आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत आल्यास पुर्णपणे दारुबंदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. दारुबंदीमुळे सरकारला वार्षिक 4 हजार कोटी महसूलाच नुकसान होत आहे.