उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या दोन मुलींसह १६० महिलांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:26 AM2020-01-22T05:26:30+5:302020-01-22T05:27:11+5:30
जमावबंदी आदेश मोडून निदर्शने केल्याबद्दल प्रख्यात उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या २ मुलींसह १६० महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे
लखनौ : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) यांच्या विरोधात उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे जमावबंदी आदेश मोडून निदर्शने केल्याबद्दल प्रख्यात उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या २ मुलींसह १६० महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ऑ
येथील ऐतिहासिक क्लॉक टॉवर (घंटाघर) जवळ शुक्रवारपासून ही निदर्शने सुरू आहेत. मुनव्वर राणा यांच्या दोन मुली फौजिया व सुमैया सोमवारी रात्री या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस उपायुक्त (पश्चिम विभाग) विकासचंद त्रिपाठी यांनी सांगितले की, क्लॉक टॉवर परिसरात जमावबंदी आदेश लागू असतानाही महिला तिथे निदर्शने करीत आहेत. त्यामुळे ठाकूरगंज पोलीस ठाण्यात या निदर्शकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. दिल्लीतील शाहीन बागेप्रमाणेच लखनौतील क्लॉक टॉवर येथेही गेल्या पाच दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. असेच आंदोलन या शहरातील गोमतीनगरमध्येही सोमवारी संध्याकाळी झाले. तेथील दर्ग्याजवळ काही महिलांनी निदर्शने केली. (वृत्तसंस्था)
विरोध कायमच
उत्तर प्रदेशमध्ये एनआरसी व सीएएच्या विरोधात काही ठिकाणी डिसेंबर महिन्यात हिंसक निदर्शने झाली होती. त्यावेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या आरोपींकडून भरपाई वसूल करण्यासाठी त्यांना प्रशासनाने नोटिसाही जारी केल्या. त्याला या आरोपींनी दिलेले उत्तर समाधानकारक न वाटल्यास त्यांची मालमत्ता जप्त करून, तिच्या लिलावातून येणाºया रकमेतून भरपाई वसूल केली जाईल. उत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. सीएए, एनआरसीला उत्तर प्रदेशात असलेला विरोध अद्यापही मावळलेला नाही.