देशातील ४० टक्के खासदारांवर फौजदारी खटले; ADR च्या अहवालात खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:55 AM2023-09-13T07:55:07+5:302023-09-13T07:56:41+5:30
देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती ३८.३३ कोटी रुपये आहे.
नवी दिल्ली : देशातील जवळपास ४० टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असून, त्यापैकी २५ टक्के खासदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्याखाली गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात 'द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने माहिती दिली आहे. तसेच, देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती ३८.३३ कोटी रुपये आहे.
लोकसभा व राज्यसभेतील एकूण ७७६ खासदारांपैकी ७६३ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांतील माहितीच्या आधारे 'एडीआर' व 'नॅशनल इलेक्शन वॉच' या संस्थांनी ही आकडेवारी दिली आहे. खासदारांनी आपली शेवटची निवडणूक आणि त्यानंतरची कोणतीही पोटनिवडणूक लढवण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही आकडेवारी काढण्यात आली आहे. लोकसभेच्या चार आणि राज्यसभेच्या एक जागा रिक्त असून जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा अपरिभाषित आहेत. तसेच, एक लोकसभा खासदार आणि तीन राज्यसभा खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले नाही, कारण ही कागदपत्रे उपलब्ध नव्हती.
एडीआरच्या माहितीनुसार, ७६३ विद्यमान खासदारांपैकी ३०६ (४० टक्के) विद्यमान खासदारांवर फौजदारी गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर १९४ (२५ टक्के) विद्यमान खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्हे इत्यादींचा समावेश आहे. केरळमधील लोकसभा व राज्यसभेच्या २९ खासदारांपैकी २३ खासदारांवर गुन्हे दाखल आहे. बिहारमधील ५६पैकी ४१, महाराष्ट्रातील ६५पैकी ३७, तेलंगणातील २४ पैकी १३, उत्तर प्रदेशातील १०८ पैकी ३७ आणि दिल्लीतील १० पैकी पाच खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात दोन्ही सभागृहांतील खासदारांचा समावेश आहे.
भाजपच्या १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद!
भाजपच्या एकूण ३८५ खासदारांपैकी १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे, तर काँग्रेसच्या ८१ खासदारांपैकी ४३ खासदारांविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत. इतर पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस ३६पैकी १४, राष्ट्रीय जनता दल सहापैकी पाच, 'माकप' आठपैकी सहा, आम आदमी पक्ष ११पैकी तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठपैकी तीन याप्रकारे गुन्ह्यांची नोंद आहे.