दार्जिलिंग चहाचा बाजारात तुटवडा, गोरखालँड आंदोलनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:11 AM2017-08-04T01:11:15+5:302017-08-04T01:11:21+5:30
स्वतंत्र गोरखालँड राज्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने गेले ४५ दिवस चालविलेल्या आंदोलनाचा चहाचे उत्पादन व लिलाव यांवर मोठा परिणाम झाला असून येथील चहाच्या किमतीमध्ये गेल्या महिन्याभरात ५0 ते १00 टक्के इतकी वाढ झाली आहे.
मुंबई : स्वतंत्र गोरखालँड राज्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने गेले ४५ दिवस चालविलेल्या आंदोलनाचा चहाचे उत्पादन व लिलाव यांवर मोठा परिणाम झाला असून, येथील चहाच्या किमतीमध्ये गेल्या महिन्याभरात ५0 ते १00 टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच तेथील प्रीमियम दर्जाच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत.
गोलखालँड आंदोलनाचा पहिला फटका दार्जिलिंग व ईशान्येकडील राज्यांच्या पर्यटनाला बसला. आता दार्जिलिंग भागातील प्रमुख उत्पादन असलेल्या चहावरही त्याचा परिणाम होत आहे. या आंदोलनांमुळे दार्जिलिंगमधील चहाचे ८७ मळे बंद झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन घटले असून, तुटवड्यामुळे चहाच्या किमती वेगाने वाढत आहेत.
आंदोलनाचा सर्वाधिक फटका मळ्यांमध्ये काम करणा-या मजुरांना बसला आहे. चहाच्या सर्व ८७ मळ्यांतील काम बंद झाल्यामुळे, त्यात काम करणाºया तब्बल ७५ हजार मजुरांवर बेकारीचे संकट ओढावले आहे. चहाच्या मळ्यांतील काम १५ जूनपासून बंद असून, त्यामुळे मळेमालकांचेही २५0 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
संपूर्ण दार्जिलिंग परिसराचे झालेले नुकसान ४00 कोटी रुपयांच्या घरात आहे. दार्जिलिंग परिसरातील लोकांचे जीवनमान पूर्णपणे चहाचे उत्पादन व पर्यटनावर अवलंबून आहे. येथील एकूण महसुलापैकी ९0 टक्के उत्पन्न चहा व पर्यटनातून येते. या दोन्ही महत्त्वाच्या स्रोतांवर कुºहाडच कोसळली आहे.
गोरखालँड आंदोलनाचा परिणाम ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. चिकन्स नेक नावाने ओळखल्या जाणाºया
आणि ईशान्येकडील राज्यांना जोडणाºया भागात हे आंदोलन सुरू आहे. इथूनच सिक्किमला अन्नधान्ये व इंधनाचा पुरवठा होतो. तो सध्या बंद आहे.
सिक्किमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीही त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सिक्किममध्ये यामार्गे येणा-या पर्यटकांचे प्रमाणही ८0 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सिक्किम सरकारने पश्चिम बंगाल सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
या आंदोलनामुळे आमचे काही हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सिक्किमचा दावा आहे.
ब्रिटिशांना आवडतो दार्जिलिंगचा चहा, इंग्लंडमध्ये मानाचे स्थान भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना सिव्हिल सर्जन आर्थर कॅम्पबेल यांची १८३९ साली काठमांडूहून दार्जिलिंगला बदली झाली. त्यांनी १८४१मध्ये कुमाऊवरुन काही चहाची रोपे आणून दार्जिलिंगला लावली. त्यांच्या या कामाला १८४७मध्ये वेग आला आणि तिथे चहाची लागवड वाढत गेली.
ब्रिटिशांनी १८५0 साली दार्जिलिंगमध्ये चहाची लागवड आणि विक्री सुरू केली. आजच्या घडीला १७ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर सुमारे ९0 लाख किलो चहाचे उत्पादन होते. ब्रिटिशांना दार्जिलिंगचा चहा आवडत असे आणि आजही त्या चहाला इंग्लंडमध्येही मानाचे स्थान आहे.