नाशिकमधील तीन तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट, ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्य

By संदीप भालेराव | Published: August 21, 2023 02:45 PM2023-08-21T14:45:43+5:302023-08-21T14:49:18+5:30

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार इतके क्षेत्र प्रस्तावित असून आत्तापर्यंत ५ लाख ९१ हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Crisis of double sowing in three taluks of Nashik, less than 50 percent rainfall | नाशिकमधील तीन तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट, ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्य

नाशिकमधील तीन तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट, ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्य

googlenewsNext

नाशिक : हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत नाशिक जिल्ह्यातील पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप शेतपिकांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन संकटात सापडले आहे; तर तीन तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. येत्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार इतके क्षेत्र प्रस्तावित असून आत्तापर्यंत ५ लाख ९१ हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप पेरणीची टक्केवारी ९२ टक्के इतकी झाली असली तरी पावसाचा खंड पडल्याने खरिपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतरही नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतीव्यवसायाचे गणित कोलमडून पडले आहे. सोयाबीन, मका आणि कापूस पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पिकांच्या वाढीवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या हाती थोडेफार पीक हाती लागते की नाही, याचीही चिंता आहे.

पावसाचा खंड पडल्याने सिन्नर, चांदवड आणि नांदगाव तालुक्यांतील काही मंडळांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. येथील पिकांची वाढ खुंटली आहे; तर पाण्याअभावी पिकांवर परिणाम होत असल्याने या तालुक्यांमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप काळ हा संकटाचा काळ असून आगोदरच शेतमालाचे पडलेले भाव आणि आता खरीपाच्या पिकांची चिंता अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकल्याने आगामी काळात शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतुदीची मागणी होण्याचीही शक्यता आहे.

Web Title: Crisis of double sowing in three taluks of Nashik, less than 50 percent rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक