‘ही’ लस घेणाऱ्यांवर संकट? लवकर कमी होते प्रतिकारशक्ती, बूस्टर डोसची भासू शकते गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 09:20 AM2021-12-23T09:20:52+5:302021-12-23T09:22:21+5:30
या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमधील प्रतिकारशक्ती तीन महिन्यांत कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क: ॲस्ट्राझिनेकाच्या कोरोनाविरोधी लस म्हणजेच भारतात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही पुण्यातील कंपनी बनवीत असलेली कोविशिल्ड या लसीबाबत चिंताजनक अहवाल समोर आला आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमधील प्रतिकारशक्ती तीन महिन्यांत कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले. त्यामुळे अशा लसवंतांना बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो, असे लँसेट जर्नलमधील अहवालात म्हटले आहे.
कसे केले संशोधन?
ब्राझील व स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली. ॲस्ट्राझिनेकाच्या लसीचे दोन डोस घेतलेले स्कॉटलंडचे २० लाख आणि ब्राझीलच्या ४.२ कोटी लोकांच्या माहितीवर संशोधन करण्यात आले.
संशोधनात काय आढळले?
- कोविशिल्ड घेतल्यानंतर परिणाम ३ महिन्यांतच कमी होऊ लागतो.
- त्यानंतर कोरोना झाल्यास हॉस्पिटलमध्ये भरती होणे व मृत्यूची शक्यता दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत दुप्पट होते. चार महिन्यांनी ही शक्यता तिप्पट होते.
- कोविशिल्ड घेतलेल्यांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून वाचण्यासाठी बूस्टर डोसची गरज भासेल.
पुण्यात मात्र दिसले सकारात्मक चित्र
काही दिवसांपूर्वी पुण्यातील बी.जी. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात सकारात्मक गोष्ट आढळून आली आहे. दोन्ही डोस पूर्ण करून तीन ते सात महिने झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरात अजूनही ९० टक्क्यांच्या आसपास प्रतिकारशक्ती होती. त्यामुळे सध्यातरी बूस्टर डोसची गरज नसल्याचे त्यात दिसले होते.
कोरोना विरोधात लस हे एकमेव हत्यार आहे. त्याचा प्रभाव कमी होणे हे चिंताजनक आहे. लस न घेतलेले आणि लस घेतलेले हळूहळू एकाच पातळीवर येण्याची भीती आहे. ओमायक्रॉनची सद्यःस्थिती पाहता हा अहवाल गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. - प्रोफेसर अजीज शेख, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग, ब्रिटन