संकटमोचक ११२!
By admin | Published: June 30, 2015 01:44 AM2015-06-30T01:44:41+5:302015-06-30T01:44:41+5:30
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील भीषण निर्भया हत्याकांडानंतर तब्बल अडीच वर्षांनी सरकारने अखेर देशव्यापी आपत्कालीन फोन सेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील भीषण निर्भया हत्याकांडानंतर तब्बल अडीच वर्षांनी सरकारने अखेर देशव्यापी आपत्कालीन फोन सेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. अमेरिकेतील ९११ क्रमांकाच्या धर्तीवर आता भारतातही ११२ हा तीन अंकी क्रमांक महिलांसाठी संकटमोचकाचे काम करणार आहे.
येत्या दीड वर्षात ही सेवा सुरू करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. ही सेवा प्रामुख्याने संकट काळात महिलांना अत्यंत मदतीची ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (एनईआरएस) नामक ही तीन अंकी आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागितले आहेत. १,००० कोटी रुपयांवर टर्नओव्हर असलेल्या आयटी कंपन्यांनाही ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील पाच वर्षे एनईआरएस स्थापित करून ती चालविण्यासंदर्भात प्रस्ताव देता येईल
निर्भयाच्या नावावर सुरू करण्यात येणाऱ्या या क्रमांकावर पहिल्या वर्षी सुमारे १८ कोटी कॉल्स (दर दिवसाला ५ लाख) येतील आणि पुढील पाच वर्षांत ही संख्या दुप्पट म्हणजे ३६ कोटींवर जाऊ शकते, असा गृहमंत्रालयाचा अंदाज आहे.
अशी असेल व्यवस्था
- गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे देशभरातील असंख्य केंद्रांचा समावेश असलेले एक नेटवर्क असेल. अडचणीच्या वेळी लँडलाईन, मोबाईल, एसएमएस, चॅट, ई-मेल, व्हीओआयपी, सार्वजनिक परिवहनमधील पॅनिक बटण, मोबाईल अॅप्लिकेशन अथवा इंटरनेट आदी कुठल्याही माध्यमाने यावर मदत मागता येईल.
४अत्याधुनिक कॉल सेंटर कॉलरचे लोकेशन शोधून सर्वांत जवळच्या पोलीस चौकीला त्वरित मदत करण्याचे निर्देशही देतील. अडचणीतील लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी जीपीएस आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
४१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्याकांडानंतर ही योजना आखण्यात आली होती.
निर्भया पोर्टल
४तीन अंकी क्रमांकासोबतच निर्भया पोर्टलही तयार करण्यात येईल. थेट कॉल करण्यास इच्छुक नसलेल्या महिला या पोर्टलच्या माध्यमाने मदत मागतील.