'भारत माता की जय' म्हणणा-यांनाच मारहाण - केजरीवालांची टीका

By admin | Published: April 6, 2016 11:48 AM2016-04-06T11:48:58+5:302016-04-06T11:51:05+5:30

काश्मीरमधील श्रीनगर येथे एनआयटी बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमारावरून अरविंद केजरीवालांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

Criticism of 'Bharat Mata Ki Jai', says Kejriwal | 'भारत माता की जय' म्हणणा-यांनाच मारहाण - केजरीवालांची टीका

'भारत माता की जय' म्हणणा-यांनाच मारहाण - केजरीवालांची टीका

Next
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ६ - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एनआयटी ( राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील) बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराबद्दल निंदा करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ' एकीकडे देशभरात भारतमाता की जय अशी घोषणा न देणाऱ्यांना लक्ष्य केलं जात असतानाच काश्मीरमध्ये मात्र भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच भाजपा सरकारने लाठीमार केला' असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ' या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार निंदनीय असून काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारने हे त्वरित थांबवले पाहिजे' असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. 
 
काय आहे नेमके प्रकरण?
श्रीनगरमधील एनआयटीमध्ये मंगळवारी रात्री पोलिसांनी बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर लाठीमार केला. त्यानंतर कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
गेल्या आठवड्यात ट्वेंटी-20 वर्ल्डकपमध्ये भारत वि. वेस्ट इंडीज दरम्यान रंगलेल्या उपांत्य सामन्याच्या निकालानंतर काश्मिरी व बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांत हाणामारी झाली होती. भारताचा वेस्ट इंडीजकडून पराभव झाल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. मात्र बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. या तणावामुळे एनआयटी काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारांनंतर मंगळवारी पुन्हा एनआयटी सुरु झाले असता विद्यार्थ्यांच्या एका गटाने कॅम्पसबाहेर निदर्शने केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. काही विद्यार्थ्यांनी लाठीमारचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करत, पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनीच हिंस्त्रपणा करत लाठीमार केला, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. 
दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी स्पष्ट केले असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेही नमूद केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून, दोन सदस्यीय पथक श्रीनगरकडे रवाना झाले आहे.

Web Title: Criticism of 'Bharat Mata Ki Jai', says Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.