‘लॉबी’च्या इशाऱ्यावरून माध्यमे करतात टीका
By admin | Published: April 13, 2015 04:25 AM2015-04-13T04:25:54+5:302015-04-13T04:25:54+5:30
शस्त्रास्त्र लॉबीच्या इशाऱ्यावर मीडियाच्या एका गटाने माझ्यावर हल्ला चालवला आहे. दबावतंत्राचा भाग म्हणून माझ्याविरुद्ध ‘कपटी कटकारस्थान’ रचले जात आहे
नवी दिल्ली : शस्त्रास्त्र लॉबीच्या इशाऱ्यावर मीडियाच्या एका गटाने माझ्यावर हल्ला चालवला आहे. दबावतंत्राचा भाग म्हणून माझ्याविरुद्ध ‘कपटी कटकारस्थान’ रचले जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री जनरल (सेवानिवृत्त) व्ही. के. सिंह यांनी रविवारी केला. कटकारस्थानात एक माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी सामील असल्याचा आरोपही केला.
२३ मार्चला एका कार्यक्रमासाठी पाकिस्तान उच्चायोगात गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या वादानंतर त्यांनी पत्रकार व मीडियावर मुक्तफळे उधळत गरळ ओकली होती. ‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’असे टिष्ट्वट त्यांनी केले होते. प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला.
मी लष्करप्रमुख होतो, तेव्हापासून एक शस्त्रास्त्र लॉबी माझ्याविरुद्ध काम करीत आहे. तेव्हा मला ते हरवू शकले नव्हते. अनेक लोक आहेत, ज्यांना ते पैसे वाटतात. निश्चितपणे यात काही पत्रकारही असतील, जे पैशाच्या मोबदल्यात लॉबीच्या मनासारखे छापून आणतात. निवडणूक काळात या लॉबीने बरीच ‘खैरात’ वाटली. ही लॉबी अद्यापही सक्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मी याबाबत सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)