वादग्रस्त संवादांवरून ‘आदिपुरुष’वर टीकेची झोड, संवाद जाणीवपूर्वक; लेखक मुन्तशीर यांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:50 AM2023-06-18T05:50:41+5:302023-06-18T05:52:38+5:30
हिंदू सेना या संघटनेने दिल्ली हायकोर्टात चित्रपटाविरोधात शुक्रवारीच याचिका दाखल केली आहे.
नवी दिल्ली : ‘तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की...’, असा संवाद हनुमानाच्या तोंडी वापरल्याने ‘आदिपुरुष’ चित्रपटावर टीकेची झोड उठली आहे. हनुमान आणि अन्य पात्रांसाठी वादग्रस्त संवाद वापरल्यावरून संवादलेखक मनोज मुन्तशीर यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली; परंतु हे संवाद अजिबात चुकीचे नसून जाणीवपूर्वक वापरल्याचे सांगत मुन्तशीर यांनी टीकेला उत्तर दिले.
हिंदू सेना या संघटनेने दिल्ली हायकोर्टात चित्रपटाविरोधात शुक्रवारीच याचिका दाखल केली आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. सुमारे ५०० कोटींचे बजेट असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. यात हनुमानाच्या तोंडी वादग्रस्त संवाद आहेत. यात रावणाचा मुलगा इंद्रजित हनुमानाला म्हणतो, ‘तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया’, असा संवाद वापरला आहे. तर हे संवाद चुकीचे नसून ते जाणीवपूर्वक वापरले आहेत. प्रसंग आताच्या पिढीला सहज समजावेत, म्हणून ही भाषा वापरण्यात आली, असे सांगत मुन्तशीर यांनी उत्तर दिले.
...पण कमाई सुसाट
कमाईच्या बाबतीत मात्र चित्रपट सुसाट आहे. पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटींचा गल्ला जमवला. त्यात हिंदीत ३७.२५ कोटी, दाक्षिणात्य भाषेत ५० कोटी, तर उर्वरित कमाई परदेशात झाली.
भाजपने माफी मागावी
वादग्रस्त भाषा वापरल्याबद्दल ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली.
कथानकात बदल चुकीचा
या चित्रपटातील भाषा चुकीची असून मूळ कथानकापासून दूर जाण्याची आवश्यकता नव्हती, अशी प्रतिक्रिया रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी दिली.