पीक, महागाई...! यंदाचा पाऊस थांबता थांबणार नाही; हवामान देतेय विचित्र संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 08:24 PM2024-08-30T20:24:56+5:302024-08-30T20:25:06+5:30
हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे.
यंदा ऑगस्ट संपत आला तरी अनेक भागात रिमझिम नाही तर मुसळधार पाऊस पडत आहे. आधी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये पुराचा कहर केल्यानंतर आता गुजरात, राजस्थानमध्ये पावसाने हाहाकार माजविलेला आहे. काही केल्या हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच आता पाऊस सप्टेंबर नाही तर पार ऑक्टोबरपर्यंत पडतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मान्सून परतण्यास सप्टेंबर अखेर किंवा त्यापेक्षाही पुढे सुरुवात होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळी आदीचे उत्पादन सप्टेंबरअखेर घेतले जाते. यामुळे जर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.
पुढील पीक थंडीत पेरले गेले तर त्याचा फायदा पिकाला होणार आहे. कारण जमिनीमध्ये ओलावा राहणार असून गहू, चण्यासारख्या पिकाला याचा फायदा होणार आहे. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ संशोधकाने रॉयटरला याची माहिती दिली आहे.
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरु होऊन तो १७ सप्टेंबरपर्यंत संपतो. परंतू यंदा तो ऑक्टोबर मध्य गाठणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गहू, साखर आणि तांदूळ उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या हवामानामुळे शेतमालाच्या निर्यातीत अडचणी येणार आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात सात टक्के अधिक पाऊस होता. काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा सरासरीपेक्षा 66 टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाल्यास पिकांवर परिणाम होऊन खाद्यपदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.