बापरे! लोकांकडे भीक मागणारा स्वीपर निघाला करोडपती; 10 वर्षांपासून काढला नाही पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:08 PM2022-05-25T12:08:41+5:302022-05-25T12:10:26+5:30

अस्वच्छ कपड्यांमध्ये फिरणारा आणि दुसऱ्यांकडे भीक मागणारा एक कर्मचारी (स्वीपर) करोडपती असल्याचं समोर आलं आहे.

crorepati sweeper dheeraj did not withdraw salary for 10 years allahabad prayagraj | बापरे! लोकांकडे भीक मागणारा स्वीपर निघाला करोडपती; 10 वर्षांपासून काढला नाही पगार

फोटो - आजतक

Next

नवी दिल्ली - भीक मागून आयुष्य काढणाऱ्या व्यक्तींकडे देखील लाखोंची संपत्ती असल्याच्या काही घटना याआधी समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. ज्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. अस्वच्छ कपड्यांमध्ये फिरणारा आणि दुसऱ्यांकडे भीक मागणारा एक कर्मचारी (स्वीपर) करोडपती असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडे एवढा पैसा आहे याची कोणालाच माहिती नव्हती. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून धीरज असं या व्यक्तीचं नाव आहे. तो प्रयागराज येथील सीएमओ कार्यालयाच्या कुष्ठरोग विभागात स्वीपर म्हणून काम करतो.

कुष्ठरोग विभागात काम करणाऱ्या धीरजच्या खात्यात 70 लाख रुपये असून त्याच्याकडे जमीन आणि घरही आहे. विशेष म्हणजे त्याने गेल्या 10 वर्षांपासून बँकेतून त्याचा पगारही काढलेला नाही. आता बँक त्याला त्याचा पगार काढण्याची विनंती करत आहे. मात्र सफाई कामगार धीरज लोकांकडे पैसे मागून दैनंदिन खर्च भागवतो. धीरजचे घाणेरडे कपडे पाहून लोक त्याला भिकारी समजतात. लोकांच्या पायाला हात लावून पैसे मागून तो आपला खर्च भागवतो. लोक भिकारी समजून त्याला पैसेही देतात. पण वास्तविक मात्र या धीरजच्या बँक खात्यात तब्बल 70 लाख रुपये आहेत. 

घाणेरडे कपडे घालून भीक मागत फिरणारा धीरज श्रीमंत असल्याची कोणालाच माहिती नव्हती. एकेदिवशी त्याचा शोध घेत बँकेचे कर्मचारी कुष्ठरोग कार्यालयात पोहोचले तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर धीरजचं खरं रूप कर्मचाऱ्यांना कळालं. त्याने 10 वर्षांपासून पगार काढला नसून, त्याच्या नावावर घर आणि जमीन आहे, अशीही माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली. धीरजचे वडील याच विभागात स्वीपर म्हणून काम करत होते आणि नोकरी सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या जागी धीरजला 2012 मध्ये नोकरी मिळाली. 

नोकरीला लागल्यापासून आजपर्यंत धीरजने बँकेतून कधीही पगार काढला नाही. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे पैसे मागून तो आपला खर्च भागवतो. याशिवाय त्याच्या आईला पेन्शन मिळते, यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष म्हणजे, धीरजने पगारातला एक रुपयाही काढला नसला तरी इन्कम टॅक्स न चुकता आठवणीने भरतो. धीरज त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहतो. त्याचं अजून लग्न झालेलं नाही आणि त्याला लग्नही करायचं नाही. आपले पैसे कोणीतरी घेईल अशी भीती वाटत असल्याने त्याला लग्नच करायचं नाही. तर काही कर्मचाऱ्यांचा मते धीरजचं मानसिक संतुलन ठीक नाही. पण, तो त्याचं काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: crorepati sweeper dheeraj did not withdraw salary for 10 years allahabad prayagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक