कोट्यवधी लोकांना एटीएममधून काढता येणार नाहीत पैसे, समोर येतंय असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:40 IST2023-01-23T15:39:59+5:302023-01-23T15:40:22+5:30
Bank Strike: जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. २८ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत बँकांची सेवा बाधित होण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी लोकांना एटीएममधून काढता येणार नाहीत पैसे, समोर येतंय असं कारण
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. २८ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत बँकांची सेवा बाधित होण्याची शक्यता आहे. बँक युनियनकडून २ दिवसांच्या संपाची घोषणा करण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एटीएममधून रोख रक्कम काढण्यासह अनेक सेवा खंडित होण्याची शक्यता आहे.
बँक युनियननी ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. त्याबरोबरच २८ जानेवारी रोजी चौथा शनिवार आहे. त्यामुळे बँका बंद राहतील. तर २९ जानेवारी रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्ही तुमची आवश्यक कामे शुक्रवार २७ जानेवारीपर्यंत आटोपून घ्या, अन्यथा या कामांसाठी १ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.
मुंबईमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची बैठक झाली. या बैठकीमध्ये बँक युनियननी दोन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँक युनियन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी संपावर जात आहेत.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी माहिती देताना सांगितले की, युनायटेड फोरममध्ये बैठक झाली आहे. त्यामध्ये २ दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, बँकांचे कामकाज ५ दिवस करण्यात यावे, अशी बँक युनियनची मागणी आहे. त्याबरोबरच पेन्शनलाही अपडेट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्याबरोबरच एनपीएसला संपुष्टात आणावे आणि पगारवाढीसाठी चर्चा करण्यात यावी. त्याशिवाय कॅडरमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसह संपावर जाण्याचा निर्णय युनियननी घेतला आहे.