लसीकरणासाठी ज्येष्ठांची गर्दी; पंतप्रधान म्हणाले, लस घ्या अन् देशाला कोरोनापासून मुक्त करा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:46 AM2021-03-02T06:46:56+5:302021-03-02T06:47:23+5:30
दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना दिला जाणार डाेस.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या सोमवारी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरच देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लाखो लोकांनी विविध रुग्णालये व केंद्रात जाऊन लस घेतली. बड्या नेत्यांनी लस घ्यायला सुरुवात केल्याने आता लसीकरणाची गती वाढेल, अशी खात्री वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली.
ही लस घेतल्याने आपणास कोरोनाची लागण होणार नाही, हा विश्वास असल्याने लोकांनी गर्दी केली होती. काही जण नोंदणी न करताच केंद्रांवर पोहोचले, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणास विलंब लागला. मात्र या अडचणी बहुतांश ठिकाणी दूर झाल्या.
गमछा आसामचा, नर्स केरळ, पुदुच्चेरीच्या
लस घेण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांच्या गळ्यात आसामचा गमछा होता. लस देणाऱ्या पी. निवेदा या पुदुच्चेरीच्या असून, त्यांना मदत करणारी रोसम्मा अनिल केरळची आहे. केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत, हे विशेष!
कोणती लस घेतली?
पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. ही लस आवर्जून घ्यावी, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मूळच्या पुदुच्चेरीच्या परिचारिका पी. निवेदा यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस पंतप्रधानांना दिला.
राजकारण्यांसाठी
जाड सुई?
n पंतप्रधानांना लसीचा डोस नर्स पी. निवेदा यांनी टोचला. ती होताच मोदींनी विचारले : लस टोचून झाली? मला कळलेच नाही.
n राजकारण्यांची कातडी जाड असल्याने त्यांना लस टोचण्यासाठी खास जाड सुई असते का, असा विनोदही त्यांनी केला.
त्या दोघी आनंदी : निवेदा व रोसम्मा अनिल यांनी सांगितले की, पंतप्रधान लस घेण्यासाठी येणार आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. पंतप्रधानांना लस देता आली, याचा आम्हाला आनंद आहे.
संभ्रम दूर होईल : पंतप्रधानांनी लस घेतल्याचे पाहून लोकांचा आत्मविश्वास वाढेल, संभ्रम दूर होईल आणि तेही लेस घेतील, असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.
बिहारमध्ये सर्वांना मोफत : पाटण्यात लस घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण बिहारमध्ये प्रत्येकाला मोफत लस दिली जाईल, खासगी रुग्णालयांतही रक्कम आकारली जाणार नाही, अशी घोषणा केली.
१.११कोटी
कोरोनाबाधित
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ११ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ७ लाख ८६ हजार जण बरे झाले आहेत. सोमवारी कोरोनाचे साडेपंधरा हजार नवे रुग्ण आढळले असून सलग पाचव्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली.
कोरोनाविरोधातील युद्धात भारताचे योगदान महत्त्वाचे आहे. अगदी कमी वेळात भारताने या लसी विकसित केल्या. सर्वांनी लस घेऊन या आजारापासून देशाला मुक्त करावे. - नरेंद्र मोदी