लॉकडाउन धुडकावून रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:53 PM2020-04-17T23:53:57+5:302020-04-17T23:54:18+5:30
चितापूर येथील सिद्धलिंगेश्वर मंदिरामध्ये रथोत्सवासाठी काही भाविक उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक उपक्रम तसेच धार्मिक सोहळे आयोजिण्यास बंदी आहे
बंगळुरू : कोरोना साथीचा फैलाव होऊ नये म्हणून लागू केलेल्या लॉकडाउनचे नियम धुडकावून कर्नाटकमधील कलबुर्गीनजिकच्या चितापूर येथील मंदिर परिसरात रथोत्सवासाठी शंभर-दीडशे भाविक गुरुवारी सकाळी जमले होते. पोलिसांनी २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.
चितापूर येथील सिद्धलिंगेश्वर मंदिरामध्ये रथोत्सवासाठी काही भाविक उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक उपक्रम तसेच धार्मिक सोहळे आयोजिण्यास बंदी आहे. तरीदेखील सिद्धलिंगेश्वर मंदिराच्या परिसरात रथोत्सव पार पडला. कलबुर्गी परिसरात कोरोनाचे आतापर्यंत १७ रुग्ण आढळून आले असून त्यातील तिघे मरण पावले आहेत. चितापूर येथे सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या भाविकांमुळे या परिसरात कोरोना साथीचा आणखी फैलाव होण्याची भीती आहे. कर्नाटक मध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. लॉकडाउनचे अतिशय कडक पालन केले जात आहे असे तेथील भाजप सरकार सांगत असले तरी त्याच पक्षाच्या एका आमदाराने स्वत:च्या निवासस्थानी शेकडो लोकांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर आता हा चितापूरचा प्रकार घडला आहे.
मंदिराजवळ गुरुवारी सकाळी भाविक जमा झाले. या देवतेचा रथ त्यातील काही भाविकांनी विशिष्ट अंतरापर्यंत ओढून नेला. हा धार्मिक सोहळा सिद्धलिंगेश्वर देवस्थानाच्या समितीने आयोजिला होता की धार्मिक सोहळ््यांच्या आयोजनावर सध्या बंदी असूनही भाविकांपैकीच कोणीतरी पुढाकार घेतला याचा आम्ही शोध घेत आहोत, असे कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक लॅडा मार्टिन यांनी सांगितले.