"भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली"; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:23 AM2024-03-08T09:23:45+5:302024-03-08T09:24:48+5:30

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

Crown of India Breathes Free Now, Jammu and Kashmir Reaches Height of Development says Narendra Modi | "भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली"; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

"भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली"; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

सुरेश एस डुग्गर

जम्मू/श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरने विकासाची नवी उंची गाठत येथील नागरिक आता मोकळा श्वास घेत आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील जाहीर सभेत सांगितले. काँग्रेसने कलम ३७० वरून जम्मू-काश्मीरच्या लोकांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीनगर येथे झालेल्या सभेत त्यांनी ६४०० कोटींहून अधिक विकासकामांचे लोकार्पण केले, तसेच एक हजार युवकांना नियुक्तीपत्रही देण्यात आले.

मोदी म्हणाले, श्रीनगरच्या अद्भुत लोकांमध्ये आल्याचा आनंद आहे. विकसित जम्मू काश्मीर हे भारतासाठी आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा मुकुट असल्याचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की, विकसित जम्मू आणि काश्मीर बनवण्याचा मार्ग पर्यटनाच्या शक्यता आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून निघेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नाझीम नावाच्या मध विक्रेत्याने मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनीही त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली. याचा फोटो शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, माझा मित्र नाझीमसोबतचा एक कायम आठवणीत राहणारा सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून मलाही आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा, असे मोदींनी म्हटले.

शंकराचार्य पर्वताला केले नमन
मोदी यांनी श्रीनगरला येताच सभेपूर्वी शंकराचार्य पर्वतावरील मंदिराला नमस्कार केले. त्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक प्रचंड उत्साह दिसला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी हाती फलक घेतले होते.

शहीद सैनिकांना श्रद्धांजली
- विमानतळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी बदामीबाग छावणी येथील युद्ध स्मारकावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. 
- त्यानंतर ‘विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीर’ कार्यक्रमात त्यांनी ६४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे अनावरण केले.

उपस्थितांची प्रचंड गर्दी; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जम्मू-काश्मीरमधील असंख्य लोक श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर उपस्थित होते. त्यांनी मोदींचे मुखवटे घातले होते आणि त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त श्रीनगरसह खोऱ्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले होते.
................
पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाख
कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

जयपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदविकाधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली. 
  बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, ‘गिग इकॉनॉमी’त सामाजिक सुरक्षा आणि ‘युवा रोशनी’ यांचा समावेश राहील.
  आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकप्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल.

‘गिग वर्कर्स’साठी 
सुरक्षा कायदा
ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’साठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली.
राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी ‘युवा रोशनी’ योजनेची घोषणा केली. 
ज्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले.

Web Title: Crown of India Breathes Free Now, Jammu and Kashmir Reaches Height of Development says Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.