काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर केल्याबद्द्ल CRPFने व्यक्त केला खेद
By admin | Published: July 26, 2016 11:14 AM2016-07-26T11:14:44+5:302016-07-26T11:14:44+5:30
काश्मीरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पेलेट गनचा वापर केल्याबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) खेद व्यक्त केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 26 - काश्मीरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पेलेट गनचा वापर केल्याबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) खेद व्यक्त केला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून काश्मीरमधील परिस्थिती तणावपुर्ण आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी सीआरपीएफने पेलेट गनचा वापर केला. पेलेट गनचा वापर केल्याने अनेक तरुणांच्या डोळ्याला जखम झाली आहे. याबद्द्ल सीआरपीएफने खेद व्यक्त केला आहे.
मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पेलेट गनचा पुन्हा काळजीपुर्वक वापर करण्यात येईल असंही सीआरपीएने सांगितलं आहे. मात्र भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
'पेलेट गनमुळे तरुणांना झालेल्या जखमांबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. आम्ही स्वत: याचा कमीत कमी वापर करण्यात यावा यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, लोकांना नियंत्रित करणं शक्य नसतं त्यावेळी आम्ही पेलेट गनचा वापर करतो', असं सीआरपीएफचे डीजी के दुर्गा प्रसाद यांनी सांगितलं आहे. 'अशा परिस्थितींमध्ये जवानांना भावनिक होण्याची परवानगी नाही', असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
'फक्त जम्मू काश्मीरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असल्याने तिथे जवानांना नाईलाजास्तव पेलेट गनचा वापर करावा लागला. सर्व जवानांना आदेश देण्यात आले आहेत की, पुढच्या वेळी पेलेट गनचा वापर केल्यास गुडघ्याच्या खाली मारण्यात यावे. आंदोलनकर्ते जवानांच्या खूप जवळ आल्यानंतर सुरक्षेसाठी जवानांना पेलेट गनचा वापर करावा लागला, कारण दोन्ही बाजूला जीव जाण्याची शक्यता असते', अशी माहिती के दुर्गा प्रसाद यांनी दिली आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वनी मारला गेल्यानंतर तरुणांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. जवानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. सीआरपीएफच्या जवानांनी पेलेट गनचा वापर केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनादेखील संसदेत पेलेट गनच्या वापरावर कमिटी गठीत करुन यावर आपण दुसरा पर्याय शोधू शकतो याची तपासणी करत असल्याची माहिती दिली होती.