सीआरपीएफच्या जवानानेही वाचला आता समस्यांचा पाढा
By admin | Published: January 13, 2017 01:10 AM2017-01-13T01:10:03+5:302017-01-13T01:10:03+5:30
बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाचा निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आता केंद्रीय राखीव पोलीस
नवी दिल्ली : बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाचा निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानानेही फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला असून, सीआरपीएफवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच त्यात वाचला आहे.
जीत सिंह असे त्याचे नाव असून, तो २६ वर्षांचा आहे. या व्हिडीओतून त्याने लष्कराच्या तुलनेत सीआरपीएफला मिळणाऱ्या सोईसुविधांमध्ये तफावत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लष्कराचे जवान आणि निमलष्करी दलातील जवानांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समस्येवर तोडगा काढावा, अशी त्याची मागणी आहे. सीआरपीएफच्या जवानांनाही पेन्शनसह अन्य सुविधा मिळाव्यात, अशी मागणी जीत सिंहने केली आहे.
तो व्हिडीओमध्ये म्हणतो : मी कॉन्स्टेबल जीत सिंह, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा जवान असून, तुमच्या माध्यमातून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत संदेश पोहोचवू इच्छित आहे. तुम्ही मला सहकार्य कराल, असा मला विश्वास आहे. आम्ही सीआरपीएफच्या जवानांनी असे कोणते कर्तव्य आहे की, जे बजावले नाही? सर्व मोठ्या निवडणुकांपासून ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळीही आम्ही काम करतो. शिवाय व्हीआयपी सुरक्षा, व्हीव्हीआयपी सुरक्षा, संसद भवन, विमानतळ, मंदिर, गुरुद्वारा, मस्जिदसारखे कोणतेही ठिकाण नाही, जिथे सीआरपीएफचे जवान आपले कर्तव्य बजावत नाहीत.
एवढे करूनही लष्कर, तसेच सीआरपीएफ व इतर निमलष्करी दलाच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये इतका फरक आहे की, ते ऐकून तुम्हीही अस्वस्थ व्हाल. सरकारी शाळा-कॉलेजांमधील शिक्षकांना ५0 ते ६0 हजार रुपये पगार मिळतो. प्रत्येक सण ते घरी साजरा करतात. आम्हाला मात्र, कुठे छत्तीसगड, कुठे झारखंड, कुठे जंगलात, तर कुठे जम्मू काश्मीरमध्ये तैनात केलेले असते. धड वेळेवर सुट्टीही मिळत नाही. मित्रांनो, हे दु:ख समजून घ्यायला कोणीही नाही. कर्तव्ये पार पाडल्यानंतरही आमचा या सुविधांवर हक्क नाही का? आमची पेन्शन बंद करण्यात आली. २0 वर्षांच्या सेवेनंतर आम्ही करणार तरी काय? माजी सैनिकांसाठी असलेला कोटा आम्हाला लागू नाही, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा आम्हाला नाहीत. लष्कराला मिळणाऱ्या सुविधांबद्दल आमचा काहीच आक्षेप नाही, पण आमच्याबाबतीतच भेदभाव का? (लोकमत न्यूज नेटवर्क)
जवानांच्या निकृष्ट अन्नाबाबत उच्च न्यायालयात याचिका
नियंत्रण रेषेवर तैनात सुरक्षा दलांना निकृष्ट अन्न दिले जात असल्याच्या बीएसएफ जवानाच्या दाव्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी लष्करी कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होऊ शकते.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तेजबहादूर यादव या जवानाने ९ जानेवारी रोजी सोशल मीडियावर सुरक्षा दलांना मिळणाऱ्या अन्नाचा व्हिडीओ पोस्ट करून, जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप केला होता.
च्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्व निमलष्करी दलाबाबतचा स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्रालयाला द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे
याचिकाकर्ते पुरणचंद आर्य यांनी विधिज्ञ अभिषेक कुमार चौधरी यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली. सुरक्षा दलातील सर्व श्रेणींसाठी रेशनची खरेदी कशी होते, अन्न कसे तयार केले जाते आणि त्याचे वाटप कसे होते याचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्रालय आणि पाचही निमलष्करी दलांना द्यावेत, अशी मागणी आर्य यांनी केली आहे.
सुरक्षा जवान आणि नागरिकांचे मनोधैर्य खचू नये, म्हणून या प्रकरणात दोषी असलेले अधिकारी किंवा प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असेही या याचिकेत म्हटले आहे.
बीएसएफ जवान यादव याने मोबाइल फोन आणि सोशल मीडियाद्वारे रेशनच्या निकृष्ट दर्जाची तक्रार केली होती. यादव याने पोस्ट केलेल्या व्हिडीओला १० लाखांहून अधिक युजर्स मिळाले आहेत. यादव याने जवानाच्या डब्यात कसे अन्न असते, हे व्हिडीओद्वारे दाखविले होते.
बीएसएफ जवानाने अन्नाची मूलभूत मागणी केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध
कारवाई केली जाऊ नये. जवानांना दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अन्न तयार करण्याचे निर्देश द्यावेत, असेही या याचिकेत म्हटले आहे.
पंतप्रधानांनी मागविला अहवाल
सीमा भागात कर्तव्यावर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना नित्कृष्ट प्रतीचे अन्न दिले जात असल्याच्या बीएसएफचा जवान तेजबहादूर याने केलेल्या आरोपावर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) गृह मंत्रालयास अहवाल सादर करण्यास गुरुवारी सांगितले. पीएमओने याबाबत केलेल्या हस्तक्षेपाचे तेजबहादूरची पत्नी शर्मिला यांनी स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी या विषयात हस्तक्षेप केला त्याबद्दल मी आनंदी आहे. पंतप्रधानांचे या विषयाकडे लक्ष वेधायचे होते त्यात माझे पती यशस्वी झाले. आता सीमा भागातील जवानांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळतील अशी मला आशा आहे.