पायात गोळी लागलेली असतानाही लढत राहिला CRPF जवान, 8 किमी चालत स्वत: रुग्णालयात पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 06:31 PM2018-02-26T18:31:09+5:302018-02-26T18:31:09+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे
छत्तीसगड - केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे. नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु असताना जवानाच्या पायाला गोळी लागली होती. मात्र जवानाने हार न मानता दोन हात केले आणि विशेष म्हणजे स्वत: आठ किमी अंतर चालत रुग्णालयात पोहोचला. सीआरपीएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जवानाचा फोटो शेअर केला आहे.
ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान एक गोळी 208 कोब्रा बटालियनचे कमांडो प्रकाश चंद यांच्या पायातून आरपार गेली. मात्र यानंतरही असह्य वेदना सोसत त्यांनी लढा दिला आणि आठ किमी पायी चालले'. ट्विटरमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, 'ही त्यांची स्टाईल आहे जेव्हा ते म्हणतात आज कुछ तुफानी करते है'.
#ThumsUp boy is commando #PrakashChand of #208COBRA who fought with immense valor in pain and walked 8 kms of his own after a bullet pierced through his foot in an encounter with maoists in #Sukma.
— CRPF (@crpfindia) February 26, 2018
This is their style when they say Aaj Kuch Toofani karte hai. #COBRA#TheElites. pic.twitter.com/SHmg8DToXu
सीआरपीएफने शेअर केलेल्या फोटोत जवान प्रकाश चंद एका स्ट्रेचरवर झोपलेले दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत इतर जवानही आहेत. जखमी अवस्थेतही प्रकाश चंद अंगठा दाखवत सर्व काही ठीक असल्याचं सांगत आहेत. सीआरपीफएच्या या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून, युजर्स प्रकाश चंद यांच्या शौर्याचं कौतुक करत आहेत.
गेल्या रविवारी म्हणजेच 18 फेब्रुवारीला सुकमा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जवळपास पाच तास चकमक सुरु होती. पोलिसांनी चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार केलं होतं. यावेळी एसटीएप आणि डीआरजीचे दोन जवानही शहीद झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा येथे रस्त्याचं काम सुरु असताना नक्षलवाद्यांनी मॅनेजरची गोळी घालून हत्या केली होती. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी सहा जवान जखमी झाले होते.