खनिज तेलाचे पैसे रुपयात देण्याची भारतास सवलत द्या: मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:04 AM2018-10-16T05:04:26+5:302018-10-16T05:04:44+5:30
इंधनचटके : मोदींचे जागतिक तेल उत्पादकांना आवाहन
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाच्या चढ्या किमतींमुळे आर्थिक अडचणी सोसाव्या लागणाऱ्या भारतासारख्या देशास तेलाचे पैसे रुपयात चुकते करण्याची सवलत द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक तेल उत्पादकांना केले.
जगातील आघाडीच्या तेल उत्पादक कंपन्यांचे प्रमुख व सौदी अरबस्तान व संयुक्त अरब अमिरात यासारख्या मुख्य तेल उत्पादक देशांच्या तेलमंत्र्यांच्या गोलमेज परिषदेत पंतप्रधान बोलत होते. मोदी म्हणाले की, एकीकडे खनिज तेलाच्या किमती वाढत असतानाच दुसरीकडे भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य घसरत असल्याने खास करून भारताला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून तेलाची किंमत रुपयांत चुकती करण्याची सवलत उत्पादकांनी दिली तर भारताला मोठा दिलासा मिळू शकेल. तेल उत्पादकांनी खरेदीदारांना केवळ ग्राहक म्हणून न पाहता एकूणच बाजारपेठेच्या विकासासाठी त्यांच्याकडे भागीदार म्हणून पाहावे, असे मतही मोदी यांनी मांडले.
हे सरकार सत्तेवर आल्यापासून अशा प्रकारची ही तिसरी गोलमेज परिषद होती. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताची अडचण विशद करताना सांगितले की, गेल्या वर्षभरात जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती डॉलरच्या रूपात ५० टक्क्यांनी व रुपयाच्या रूपात ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून भारताला मोठी रोखतेची टंचाई जाणवत आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हेही या परिषदेस हजर होते.
इराणी तेलाला सौदी अरेबियाचा पर्याय
आयओसीसारख्या भारतीय तेल कंपन्यांनी सौदी अरेबिया व इराकसारख्या देशांशी अतिरिक्त तेलपुरवठ्याचे करार केले आहेत. त्यामुळे इराणवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम भारतावर होणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
२०१८-१९ या वर्षात इराणकडून २५ दशलक्ष टन तेल खरेदीचा करार भारताने केला आहे. २०१७-१८ मध्ये हा करार २२.६ दशलक्ष टनांचा होता. अमेरिकी निर्बंधांमुळे इराणकडून भारताला तेल खरेदी शक्य झाली नाही, तरी घाबरण्याचे कारण नाही. मुदत पुरवठादारांशी भारताने अतिरिक्त तेलाचे करार आधीच करून ठेवले आहेत. गरज पडेल तेव्हा ते उचलता येईल.
काही नफा तेलसाठे शोधासाठी वळवा
गेल्या दोन परिषदांमध्ये उत्पादकांनी केलेल्या सूचना मान्य करून भारताने बर्याच सुधारणा केल्या आहेत. तरी उत्पादक कंपन्यांनी भारतात फारशी गुंतवणूक केलेली नाही, असे नमूद करून पंतप्रधांनी असेही आवाहन केले की, उत्पादकांनी त्यांच्या नफ्यापैकी काही हिस्सा भारतात तेलसाठ्यांचा शोध आणि विकास करण्यासाठी गुंतवणूक म्हणून वळवावा.