दाट धुके, क्रूझर कालव्यात कोसळली; १० प्रवासी बेपत्ता, चालकाने अपघातापूर्वी उडी मारली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:49 IST2025-02-01T10:48:58+5:302025-02-01T10:49:13+5:30
रात्री हा अपघात झाला असून रात्रीच बचाव कार्य सुरु करण्यात आले. यावेळी एका १० वर्षांच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

दाट धुके, क्रूझर कालव्यात कोसळली; १० प्रवासी बेपत्ता, चालकाने अपघातापूर्वी उडी मारली, पण...
हरियाणाच्या फतेहाबादमध्ये मोठा अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे एक क्रूझर कालव्यात कोसळली आहे. या अपघातात १० प्रवासी बेपत्ता झाले आहेत. रात्री हा अपघात झाला असून रात्रीच बचाव कार्य सुरु करण्यात आले. यावेळी एका १० वर्षांच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
हे सर्वजण पंजाबमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून परतत होते. यावेळी हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हरियाणाच्या महमडा गावातील काही लोक पंजाबला एका कार्यक्रमाला गेले होते. रात्री १० च्या सुमारास ते परतत होता. रतिया गावाजवळ आले असताना भाखडा कालव्याच्या पुलावरून ही क्रूझर खाली कोसळली. धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही.
नदीत गाडी कोसळण्यापूर्वी चालक जरनेल सिंगने क्रूझरबाहेर उडी मारली. यामुळे त्याचा जीव वाचला. परंतू, घटनास्थळी ड्रायव्हर सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या वाहनात १२ लोक होते. त्यात १० वर्षांचा मुलगाही होता. त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर ५५ वर्षांच्या बलबीर सिंग यांचा मृतदेह देखील सापडला आहे.
चालकाने उडी मारल्याने तो वाचला परंतू तिथे न सापडल्याने गावातही खळबळ उडाली आहे. रतिया पोलीसही अपघात की घातपात याच्या तपासाला लागले आहेत. हे सर्वजण एका लग्न समारंभाला गेले होते. 13-14 लोक होते असे सांगितले जात आहे. मुलाला आम्ही बाहेर काढले आहे, असे हेड कॉन्स्टेबल गुरमीत सिंग यांनी सांगितले. वाटेत खूप धुके होते. यामुळे काही दिसत नव्हते आणि कार कालव्यात पडली, असे ते म्हणाले.