रोहितच्या आत्महत्येवरून रणकंदन सुरूच
By admin | Published: January 21, 2016 03:24 AM2016-01-21T03:24:01+5:302016-01-21T03:24:01+5:30
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापले असताना बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच
नवी दिल्ली/हैदराबाद : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापले असताना बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच विद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव पोडिले असे सर्वजण मैदानात उतरले. हा ‘दलित विरूद्ध सवर्ण’ वाद नाही. त्यामुळे निरर्थक विधाने करून समुदाय आणि विद्यार्थ्यांना भडकवणे थांबवा, अशा खरमरीत शब्दांत स्मृती इराणी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दत्तात्रेय यांनी स्वत:वरील सर्व आरोप धुडकावून लावले. तर कुलगुरु पोडिले यांनीही या मुद्याचे राजकारण दुर्दैवी असल्याचे सांगत रोहितसह पाच विद्यार्थ्यांच्या निलंबनामागे कुठलाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान उच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेपास नकार दिला.
इराणी यांनी पत्रपरिषदेत रोहितच्या आत्महत्येच्या मुद्यावर सरकार व आपल्या मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली. रोहितने आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र त्यांनी पत्रपरिषदेत वाचून दाखवले. त्यात कोणाचाही नामोल्लेख नाही अथवा कोणावरही दोषारोप नाही. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याबद्दल रोहितने त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. अशास्थितीत या मुद्यावर कुठलेही राजकारण व्हायला नको. मुळातच हा ‘दलित विरूद्ध सवर्ण’ असा वाद नाही, असे इराणी म्हणाल्या. हैदराबाद विद्यापीठात दोन विद्यार्थी गटांमध्ये भांडण झाले.
हे दोन्ही गट मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करीत होते. ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्यांच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणात चुकीचे तथ्य समोर केले जात आहे. ज्यांना प्रकरणाची पूर्ण माहिती नाही, असे काहीजण नाहक विधाने करण्यात गुंतले आहेत. दुर्दैव म्हणजे या निरर्थक विधानांवर मला स्पष्टीकरण द्यावे लागतेय. यापूर्वी कुठल्याही मनुष्यबळ विकास मंत्र्याने असे स्पष्टीकरण दिले नसेल, असेही त्या म्हणाल्या.
‘मी केवळ निवेदन पुढे रेटले’
हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांच्या निलंबन कारवाईसाठी मी जाणीवपूर्वक कुठलेही प्रयत्न केले नाहीत. केंद्रीयमंत्री असतानाच मी सिकंदराबाद मतदारसंघाचा खासदारही आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व समुदायाचे लोक माझ्याकडे त्यांच्या तक्रारी, समस्या व निवेदन घेऊन येतात.
काही विद्यार्थ्यांकडून स्वीकारलेले निवेदन मी संबंधित मंत्रालयाकडे पाठवले. लोकप्रतिनिधी या नात्याने असे करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. या संपूर्ण प्रकरणात माझी भूमिका इथपर्यंतच मर्यादीत होती, असे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
केंद्रीय मंत्री निलंबनासाठी दबाव टाकल्याचा आरोप फेटाळला
४रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांच्या निलंबनासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हैदराबाद विद्यापीठावर दबाव टाकल्याचा आरोपही इराणी यांनी धुडकावून लावला. संशोधन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना निलंबित करावे, अशी शिफारस केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी मनुष्यबळविकास मंत्रालयास केली होती.
४दत्तात्रेय यांच्या शिफारसीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठास या कारवाईसंदर्भात पाच स्मरणपत्रे लिहिल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने ही स्मरणपत्रे केवळ प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. सेंट्रल सेक्रेट्रिएटच्या नियमांनुसार हे स्मरणपत्रे लिहिली गेली.
४कुठल्याही खासदाराने मला पत्र लिहिल्यास त्यांना १५ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आहेत. ही प्रक्रिया आम्ही नाही तर काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने निश्चित केली आहे.
हैदाराबाद विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित करणारे बंडारू दत्तात्रेय हे एकटे नेते नाहीत. काँग्रेस नेते हनुमंत राव यांनीही १७ नोव्हेंबर २०१४ रोजी या मुद्यावर मंत्रालयास एक पत्र लिहिले होते. राव यांच्या पत्रावर विद्यापीठाकडून स्पष्टीकरण मिळवण्यासाठी आम्ही सहा स्मरणपत्रे पाठवली होती. हनुमंत राव यांनीही आपल्या पत्रात तेलंगणच्या विद्यार्थ्यांचा होणारा छळ आणि गत चार वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहितला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु अप्पा राव पोडिले यांनीही बुधवारी आपले मौन सोडले. रोहितसह चार विद्यार्थ्यांवर कुठल्याही दबावातून निलंबन कारवाई केली गेली नाही.
दुर्दैवाने या मुद्यावर राजकारण केले जात आहे, असे ते म्हणाले. मी भाजपाचा माणूस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता रोहितच्या आत्महत्येनंतर विद्यापीठाला भेट देत आहे. एका शैक्षणिक संस्थेत सुरू असलेले हे राजकारण माझ्या आकलनापलिकडचे आहे. यामुळे मी दु:खी आणि अस्वस्थ आहे, असे ते म्हणाले.