साहित्याच्या ‘महा-कुंभा’तला सांस्कृतिक दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 08:34 PM2019-01-24T20:34:30+5:302019-01-24T20:36:22+5:30
अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल, समांतर चाललेले नृत्य-संगीत-वादनाचे कार्यक्रम आणि फक्त पाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... - कुणाही विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!
- अपर्णा वेलणकर
डिग्गी पैलेस, जयपूर - भारतासह एकूण तीस देशातून आलेल्या पाचशेहून अधिक वक्त्यांची सत्रे, पंधरा भारतीय आणि तब्बल बारा आंतरराष्ट्रीय भाषांचे प्रतिनिधित्व, वक्त्यांमध्ये नोबेल-पुलीत्झर-मैन बुकर अशा मानाच्या पुरस्कार विजेत्यांना प्रत्यक्ष ऐकण्या-भेटण्याची संधी, पर्यावरणापासून कालिदासाच्या काव्यापर्यंत आणि कृत्रिम बुध्दीमत्तेच्या उदयापासून संकुचित होत चाललेल्या जागतिक वातावरणातल्या लोकशाही-अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भविष्यापर्यंत अक्षरश: अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल, समांतर चाललेले नृत्य-संगीत-वादनाचे कार्यक्रम आणि फक्त पाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... कुणाही विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!
मराठी साहित्य संमेलनाच्या किडुकमिडुक संसाराची रडगाणी ऐकून किटलेले कान संपन्नतेच्या अभिजात स्वरांनी बहरून टाकणाऱ्या जयपूर लिट-फेस्टचे गुरुवारी सकाळी डिग्गी पैलेसच्या वैभवसंपन्न आवारात उद्घाटन झाले. भारतीय साहित्य सृष्टीला जागतिक स्तरावर सन्मानाचे स्थान मिळवून देणार्या या ‘साहित्य-कुंभा’चे हे बारावे वर्ष आहे.
ोचर्या गुलाबी थंडीत जयपूरच्या डिग्गी कुटुंबियांच्या विस्तीर्ण राजवाड्याचे प्रांगण हे या साहित्य-कुंभाचे घर! आणि सर्वत्र उभ्या वृक्षांच्या रांगांंमधून वाट काढत आपापल्या आवडीच्या सत्रांची ठिकाणे शोधत जाणारे रसिकांचे घोळके ही इथली चहलपहल!
- इथे बड्या कंपन्यांनी स्वत:हून ओतलेला प्रायोजकत्वाचा पैसा आहे, त्याच्या उत्तम विनियोगाची दृष्टी आहे, राजकीय पुढार्यांना अतिरेकी महत्व देण्याची कारणे नाहीत... आणि मुख्य म्हणजे उत्साहाने सळसळणार्या साहित्य प्रेमींची अलोट गर्दी आहे!