काश्मीरमध्ये संचारबंदीसदृश परिस्थिती

By admin | Published: May 29, 2017 01:30 AM2017-05-29T01:30:19+5:302017-05-29T01:30:27+5:30

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक

Curb condition in Kashmir | काश्मीरमध्ये संचारबंदीसदृश परिस्थिती

काश्मीरमध्ये संचारबंदीसदृश परिस्थिती

Next

श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले असून, संपूर्ण खोऱ्यात संचारबंदीसदृश परिस्थिती आहे. श्रीनगर तसेच पुलवामा, शोपिया, अनंतनाग जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त आहे, तर बडगाम आणि कुलगाममध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
वाढता तणाव आणि कायदा व सुव्यवस्थेला असलेला धोका लक्षात घेऊ न संपूर्ण खोऱ्यात निमलष्करी दलाच्या तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली असून, जिथे परीक्षा आहे, तेथील विद्यार्थ्यांनाच केवळ ओळखपत्राच्या आधारे संचारबंदी असलेल्या क्षेत्रातून जाण्याची सवलत देण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंदच असून, प्रीपेड क्रमांकावर फोन करण्याची सेवाही बंद झाली आहे.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हुरियत कॉन्फरन्सने दोन दिवस बंदचे आवाहन केले असतानाच जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक याला रविवारी अटक करण्यात आली. हुरियतच्या नेत्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सबजार भट्टचा दफनविधी आज त्रालमध्ये पार पडला, तेव्हा हजारो लोक जमले होते. त्यावेळी तिथे तणाव होता; पण अनुचित घटना मात्र घडली नाही. मात्र, तो मारला गेल्यानंतर झालेली दगडफेक आणि हिंसक जमावाला पांगवण्यासाठी केलेला लाठीमार यात किमान ३0 जण जखमी झाले आहेत.
सीमा भागात पाकिस्तानातून घुसखोरीचे सत्र चालूच असून, रविवारी सैन्याने केलेल्या कारवाईत आणखी एक दहशतवादी ठार झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली. सशस्त्र दले आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेल्या गोळीबारात लष्करासाठी काम करणारा एक हमालही मरण पावला आहे.
गेल्या दोन दिवसांत सैन्याकडून दहशतवादाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ११ दहशतवादी ठार झाले आहेत. बर्फ वितळू लागल्याने आणि रमजानचा महिना सुरू झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जात आहे. (वृत्तसंस्था)

राज्यपाल राजवट लागू करा : अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरमधील चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता, राज्यात राज्यपाल राजवट लागू करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख खासदार फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच, भाजपचे काही नेते धार्मिक विद्वेष पसरविणारी वक्तव्ये करीत असून, पंतप्रधानांनी त्यांना आवर घालावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एनआयए चौकशी
तहरिक- ए- हुरियत या राष्ट्रविरोधी व फुटीरवादी संघटनेला मिळणाऱ्या आर्थिक साह्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एआयए) संघटनेचे नेते फारुख अहमद दार आणि जावेद अहमद बाबा यांना बँक आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांसह चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.

अनेक नेते स्थानबद्ध
काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर काही फुटीरवादी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

दगडफेक थांबल्याशिवाय संवाद नाही - अमित शहा

नवी दिल्ली : काश्मीरमधील दगडफेकीचे सत्र जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत तेथील कोणाशीही बोलणी करण्याची शक्यता भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेटाळून लावली. मात्र हिंसाचार थांबल्यावर सरकार सर्वांशी संवाद साधेल, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.

अमित शहा असेही म्हणाले की, सहा महिन्यांचा एखादा कालखंड विचारात घेऊन काश्मीरच्या परिस्थितीचे खरे आकलन केले जाऊ शकत नाही. त्यासाठी १९८९ ते मे २०१७ असा संपूर्ण कालखंड विचारात घ्यावा लागेल. याआधी काश्मीरमधील परिस्थिती बिघडल्याचे सहा महिने, नऊ महिने किंवा एक वर्षाचे अनेक कालखंड होऊन गेले. पण त्या प्रत्येक वेळी सुरक्षा दलांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती.

पूर्वीच्या रालोआ सरकारने फुटिरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी बोलणी केली होती, तसे आताचे सरकारही करेल का, असे विचारता शहा म्हणाले की, हिंसाचार थांबून चर्चेसाठी पोषक वातावरण तयार झाले की सर्वांशी बोलणी केली जातील.

काश्मीरमध्ये सरकार स्थापनेपूर्वी पीडीपी व भाजपा यांनी आघाडीचा जो अजेंडा ठरविला त्यात राज्यातील सर्व संबंधितांशी बोलणी करण्याचा समावेश आहे, याचे स्मरण दिल्यावर शहा म्हणाले की, हिंसाचार थांबल्यावर बोलणी केली जातील, असेच आम्ही ठरविले होते. दगडफेक सुरू असताना बोलणी होऊ शकत नाहीत. दगड मारणाऱ्यांना आम्ही फुले देऊ शकत नाही, हे त्यांनी समजायला हवे.

Web Title: Curb condition in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.