काश्मिरात संचारबंदीसदृश परिस्थिती
By admin | Published: May 30, 2017 01:30 AM2017-05-30T01:30:35+5:302017-05-30T01:30:35+5:30
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आल्याने सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदीसदृश
श्रीनगर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आल्याने सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदीसदृश स्थिती होती. श्रीनगरमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्यापासून काश्मीर खोरे हिंसक निदर्शनांनी धुमसत आहे. अनंतनाग आणि शोपिया जिल्हा आणि दक्षिण काश्मीरमधील पुलवामा शहरात तसेच बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यातील दहा जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांतील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
स्थिती नियंत्रणात...
रविवारी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असल्या, तरी एकूण स्थिती नियंत्रणात आहे. पुलवामा, कुलगाम, शोपिया आणि सोपोर या ठिकाणी रविवारी दगडफेकीच्या घटना घडल्या; परंतु काश्मीर खोऱ्यातील स्थिती शांत आणि नियंत्रणात आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. पोलीस आणि सुरक्षा दले उपद्रवखोरांचा मुकाबला करीत स्थिती हाताळताना कमालीचा संयम बाळगून कारवाई करीत आहेत.
बंदमुळे जनजीवन विस्कळीत...
दरम्यान, फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे काश्मीर खोऱ्यातील उर्वरित भागातील सामान्य जनजीवन दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झाले होते.
हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे चेअरमन आणि फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी, मीरवैझ उमर फारूक आणि जेकेएलएफचे यासिन मलिक यांनी चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या, मंगळवारी त्रालपर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. मलिक यांना रविवारी अटक करण्यात आली असून, गिलानी आणि मीरवैझ यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मोबाइल इंटरनेट सेवा बंद...
प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्री-पेड नंबरवरील दुसरीकडे कॉल करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. काश्मीर विद्यापीठाने सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. श्रीनगरमधील शाळा, महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्यात आली होती, तर पुलवामामध्ये दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.
दोन्ही जिल्ह्यांत कलम १४४...
मध्य काश्मीरमधील बडगाम आणि गंदेरबल जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात शनिवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत सबजार भट आणि त्याचा साथीदार मारला गेला होता.