हळदीमधील ‘करक्युमीन’ घटकात आहे कोरोना विषाणू मारक क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:12 PM2020-07-20T23:12:16+5:302020-07-20T23:12:42+5:30
‘जर्नल ऑफ जनरल व्हायरॉलॉजी’च्या ताज्या अंकातील माहिती
नवी दिल्ली : भारतीय स्वयंपाक घरात हमखास सापडणाऱ्या हळदीतील ‘करक्युमीन’ या घटकात कोरोना विषाणूला मारण्याची क्षमता असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘जर्नल आॅफ जनरल व्हायरॉलॉजी’ या नियतकालिकाच्या ताज्या अंकात यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्याचे संशोधन डुकरात आढळणाºया ‘अल्फा ग्रुप’ कोरोना विषाणूवर करण्यात आले आहे. लवकरच मनुष्यावर तसेच इतर कोरोना विषाणूंवरही यासंबंधीचे संशोधन केले जाणार असल्याचे नियतकालिकात म्हटले आहे.
डुकरांमध्ये पसरणाºया ‘ट्रान्समिसिबल गॅस्ट्रोएंटेराटीस व्हायरस’वर (टीजीईव्ही) हे संशोधन करण्यात आले. शरीरात करक्युमीनचे प्रमाण जितके अधिक, तितका टीजीईव्ही विषाणूचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, असे या संशोधनात आढळून आले आहे.
टीजीईव्ही हा विषाणू डुकरांच्या दोन आठवड्यांपेक्षा छोट्या पिलांत पसरतो. विषाणूग्रस्त पिलांना हगवण लागते. त्यात मृत्यूचे प्रमाण प्रचंड असते. या आजारावर लस उपलब्ध असली तरी त्यामुळे विषाणूचा प्रसार थांबत नाही.
‘करम्युमीन’ची विषाणूरोधक शक्ती तपासण्यासाठी संशोधकांनी पेशींना विविध प्रमाणात करम्युमीन दिले. त्यानंतर त्यांना विषाणूग्रस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या पेशीत जास्त प्रमाणात करम्युमीन होते, त्यांच्यात विषाणूचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आले. करम्युमीन टीजीईव्ही विषाणूला थेटपणे मारते, असाच याचा अर्थ आहे.
1 या संशोधन अहवालाचे लेखक आणि ‘वुहान इन्स्टिट्यूट आॅफ बायोइंजिनिअरिंग’चे संशोधन डॉ. लिलान शी यांनी सांगितले की, टीजीईव्ही विषाणू रोखण्याची मोठी क्षमता करम्युमीनमध्ये असल्याचे दिसून आले आहेत.
2 इतर विषाणूजन्य आजार रोखण्यातही हळदीचा उपयोग होऊ शकतो. यात डेंग्यू, हेपेटायटीस बी आणि झिका या विषाणूंचा समावेश आहे. हळदीत ट्यूमर रोधक गुणही आढळून येतो. जळजळविरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्मही आढळून येतात.
3 डॉ. शी यांनी सांगितले की, हळदीत साईड इफेक्ट नसल्यामुळे आम्ही तिचा संशोधनासाठी स्वीकार केला आहे. प्रभावी लस नसल्यामुळे विषाणूजन्य आजारांचा प्रतिकार करणे ही बाब अत्यंत कठीण होऊन बसली आहे. चीनच्या परंपरात औषधांचा वापर त्यासाठी केला जाऊ शकतो.
4 त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आम्ही हळदीवर संशोधन सुरू केले आहे. डॉ. शी यांनी सांगितले की, हळदीतील करक्युमीनच्या मनुष्यासह इतर प्राण्यांवर चाचण्या घेण्याची तयारी आम्ही करीत आहोत.