काश्मिरात संचारबंदी सुरूच, फुटीरवादी नेत्यांना अटक
By Admin | Published: August 14, 2016 01:38 AM2016-08-14T01:38:23+5:302016-08-14T01:38:23+5:30
येथील लाल चौकात धरणे आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी प्रशासनाने श्रीनगर जिल्हा आणि अनंतनाग शहरात शनिवारीही संचारबंदी कायम ठेवली.
श्रीनगर : येथील लाल चौकात धरणे आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी प्रशासनाने श्रीनगर जिल्हा आणि अनंतनाग शहरात शनिवारीही संचारबंदी कायम ठेवली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ शकले नाही. त्यातच गोळीबारातील जखमी युवकाचा मृत्यू झाल्यामुळे खोऱ्यातील बळींची संख्या वाढून ५६ झाली आहे. सुहैल अहमद वानी असे या युवकाचे नाव आहे. तो गेल्या आठवड्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला होता. उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
फुटीरवादी नेते मिरवैझ उमर फारूक आणि सईद अली शाह गिलानी यांचे लाल चौकापर्यंत मार्च काढून तेथे धरणे धरण्याचे प्रयत्न पोलिसांनी शनिवारी उधळून लावले. हे दोन्ही नेते नजरकैदेत आहेत. सर्वात आधी हुरियतचे अध्यक्ष मिरवैझ श्रीनगरजवळील निगीन येथील त्यांच्या निवासस्थानातून दुपारी बाहेर पडले. मात्र, पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली. मीरवैझ हुरियतच्या सुधारणावादी गटाचे नेतृत्व करतात. हुरियतच्या कट्टरवादी गटाचे प्रमुख गिलानी यांनी हैदरपोरा येथील त्यांच्या निवासस्थानापासून मार्च काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांनाही अडविले. तेव्हा गिलानी यांनी त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर धरणे धरली. धरणे आंदोलन अर्धा तास सुरू होते आणि ते शांततेत संपले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दोन हुरियत गटांसह यासिन मलिक यांच्या नेतृत्वाखालील जेकेएलएफने स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी उचलून धरण्यासाठी शनिवारी व रविवारी लाल चौकापर्यंत मार्च काढण्याचे आवाहन केले होते.
खोऱ्यात हिंसाचार उफाळल्यानंतर ९ जुलैपासून मिरवैझ आणि गिलानी हे नजरकैदेत आहेत, तर मलिक यांना येथील मध्यवर्ती कारागृहात बंद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
इंटरनेट सेवा काही काळ बंद
हिंसाचारामुळे खोऱ्यात शनिवारी काही काळ ब्रॉडबँड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. ब्रॉडबँड सेवा दुपारनंतर साडेचार वाजता बंद करण्यात आली होती. मात्र, पाच वाजता ती पूर्ववत करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, काही ग्राहकांनी अद्याप आपली सेवा खंडितच असल्याची तक्रार केली.