मणिपूरमध्ये निदर्शने सुरुच, तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू; आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 03:26 PM2024-09-10T15:26:51+5:302024-09-10T15:27:09+5:30
Manipur : डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास असमर्थ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
इंफाळ : मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानं निदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्यासाठी इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर थौबलमध्ये भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) च्या कलम 163 (2) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, "जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळं, कर्फ्यू शिथिल करण्यासंबंधीचे पूर्वीचे आदेश १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तात्काळ प्रभावानं रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळं पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने इंफाळमधील पूर्व जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे."
इंफाळ पश्चिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आणखी एका आदेशात म्हटले आहे की, आधीचे सर्व आदेश रद्द करून १० सप्टेंबरसाठी कर्फ्यूमधील शिथिलता आज सकाळी ११ वाजल्यापासून रद्द करण्यात आली आहे. तसेच, गेल्या वर्षी १ सप्टेंबरपासून लोकांच्या संबंधित निवासस्थानाच्या बाहेर जाण्यावरील बंदी उठवण्यात आली होती, असं आदेशात म्हटलं आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी कर्फ्यू शिथिलता पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत होती, परंतु नवीन आदेशात हे हटविण्यात आले आहे. मात्र, मीडिया, वीज, न्यायालये आणि आरोग्य यासह अत्यावश्यक सेवा कर्फ्यूच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.
डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास असमर्थ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. थौबलमध्ये कर्फ्यू लागू असल्यानं पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कारण पोलिसांनी दावा केला आहे की, सोमवारी जिल्ह्यात निदर्शक विद्यार्थ्यांपैकी एकानं गोळीबार केला आणि एक पोलीस जखमी झाला. दरम्यान, विविध शाळा आणि महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थ्यांनी इंफाळमधील खवैरामबंद महिला मार्केटमध्ये उभारलेल्या शिबिरांमध्ये रात्र काढली.
२४ तासांची मुदत
"आम्ही राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना आमच्या सहा मागण्यांना उत्तर देण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर आम्ही आमच्या कारवाईबाबत निर्णय घेऊ", असं विद्यार्थी नेता चौधरी व्हिक्टर सिंह याने मंगळवारी सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई आणि राज्याच्या प्रादेशिक आणि प्रशासकीय अखंडतेचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी मणिपूर सचिवालय आणि राजभवनासमोर निदर्शने केली होती. ताज्या हिंसक घटनांमध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.