काश्मीरमधील संचारबंदी उठली
By admin | Published: October 15, 2016 01:41 PM2016-10-15T13:41:01+5:302016-10-15T13:41:01+5:30
परिस्थितीत होत असलेली सुधारणा पाहता काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली आहे. मात्र अशांतता कायम असल्याने सामान्य जीवन अजूनही विस्कळीत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - परिस्थितीत होत असलेली सुधारणा पाहता काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली आहे. मात्र अशांतता कायम असल्याने सामान्य जीवन अजूनही विस्कळीत आहे. जुलै महिन्यात हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीच्या मृत्यूनतंर काश्मीरमध्ये अशांतता परसली होती. काश्मीरमध्ये कोठेही संचारबंदी नसून खो-यातील लोकांच्या हालचालींवरील बंदीही उठवण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे.
संचारबंदी उठवण्यात आली असली तरी खो-यात जमावबंदीचा आदेश अद्यापही लागू आहे. संवेदनशील भागांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सुरक्षित असल्याची खात्री लोकांना पटावी यासाठी सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याचंही अधिका-याने सांगितलं आहे.
तीन महिन्यांपासून बंद करण्यात आलेली प्रीपेड फोनवरील कॉल करण्याची सुविधादेखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र मोबाईल इंटरनेट सेवा अद्यापही ठप्प आहे. काश्मीरममधील सामान्य जीवन विस्कळीत होऊन 99 दिवस झाले आहेत. रविवारी 100 दिवस पूर्ण होतील. बु-हान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. सुरक्षा जवान आणि लोकांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सर्व सेवा ठप्प पडल्या होत्या. एकूण 84 लोकांनी आपली जीव गमावला ज्यामध्ये दोन सुरक्षा जवानांचादेखील समावेश आहे.