चलन तुटवडा काही आठवड्यांतच संपेल

By admin | Published: January 21, 2017 06:08 AM2017-01-21T06:08:12+5:302017-01-21T06:08:12+5:30

५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने लोकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले

The currency shortage ends in a few weeks | चलन तुटवडा काही आठवड्यांतच संपेल

चलन तुटवडा काही आठवड्यांतच संपेल

Next

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने लोकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले, सामान्य माणसाला त्रास झाला, विवाह पार पडण्यात अडथळे आले आणि काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, हे मान्य करतानाच, येत्या काही आठवड्यांत हा प्रश्न सोडविला जाईल, लोकांच्या हातात पुरेशा नोटा आलेल्या असतील, अशी खात्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
सार्वजनिक लेखा समितीच्या (पीएसी) बैठकीत पटेल यांना बोलावण्यात आले होते. समिती सदस्यांच्या नोटाबंदीसंबंधातील प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. परिस्थितीला तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आवश्यक ती पावले उचलली होती. डिजिटल पेमेंट्सवरील शुल्क आकारणी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी म्हणून रिझर्व्ह बँक बँका आणि ती सेवा देणाऱ्यांशी चर्चा करीत आहे. शहरी भागांत आता चलनतुटवडा भासत नसला तरी ग्रामीण भागांत तो काही प्रमाणात जाणवत असल्याचे उर्जित पटेल यांनी मान्य केले. ते म्हणाले की, ग्रामीण भागांत अधिकाधिक चलन पोहोचावे, याची व्यवस्था करण्यात येत असून, दोन आठवड्यात तिथेही पुरेशा प्रमाणात चलन पोहोचलेले असेल. नोटाबंदीमुळे काही काळ लोकांना खूप त्रास सहन करावा लागला असला तरी, भविष्यासाठी आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्याचा फायदा होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना थेट तोंड देण्याची ही गेल्या दोन दिवसांतील दुसरी वेळ होती. बुधवारी पटेल यांची संसदेच्या अर्थ समितीपुढेही साक्ष झाली होती.
सर्व नोटांची मोजणी सुरू
सदस्यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता घेतला होता. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता त्याची घोषणा केली होती. ते म्हणाले, ५0 दिवसांत जमा झालेल्या तसेच बदलण्यात आलेल्या सर्व नोटांची मोजणी सुरू आहे.
ती पूर्ण झाल्यानंतरच ५00 व १000 रुपये किमतीच्या किती नोटा या काळात जमा झाल्या, त्यांचे एकूण मूल्य किती आहे, हे सांगता येईल. पटेल यांच्यासमवेत रिझर्व्ह बँकेचे दोन डेप्युटी गव्हर्नर तसेच काही वरिष्ठ अधिकारीही समितीपुढे उपस्थित होते.

Web Title: The currency shortage ends in a few weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.