Corona Vaccination: "...तर भारतात सर्वांना कोरोना लस देण्यास तब्बल २० वर्षे लागणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 07:10 AM2021-02-10T07:10:56+5:302021-02-10T07:12:14+5:30
वेग वाढवण्याची नितांत गरज- देवेंद्र दर्डा; आतापर्यंत ०.५% जणांनाच मिळाला डोस
नवी दिल्ली : कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला आता ३५ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत आतापर्यंत ५८ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सध्या भारताच्या लोकसंख्येच्या केवळ ०.५ टक्केच लोकांना लस मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे गरजेचे असून त्यासाठी खासगी क्षेत्रालाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे (एबीसी) अध्यक्ष देवेंद्र दर्डा आणि रवींद्र एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष नरेंद्र मुरकुम्बी यांनी सर्वसामान्यांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी लसीकरणात खासगी रुग्णालयांच्या सहभागाची मोहीम हाती घेतली आहे.
सर्वसामान्यांच्या भल्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाबद्दल देवेंद्र दर्डा आणि नरेंद्र मुरकुम्बी म्हणाले की, “तूर्तास लसीकरण मोहिमेचा वेग खूप कमी आहे. ३५ दिवसांनंतरही केवळ ०.५ टक्के लोकसंख्येलाच लसीच्या मात्रा दिल्या गेल्या आहेत. हाच वेग कायम राहिल्यास संपूर्ण लोकसंख्येला कोरोनावरील लस देण्यासाठी किमान २० वर्षे लागतील. म्हणूनच लसीकरण मोहिमेचे विकेंद्रीकरण करून खासगी क्षेत्रालाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जावे.’’
भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी कोरोनावर प्रभावी ठरल्या असून त्या प्रत्येकाला दिल्या जाणे आवश्यक आहे. युरोप-अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असताना भारतात मात्र सुदैवाने दुसरी लाट आली नाही.
त्यामुळे आपल्याकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल असे असताना ५० वर्षे वयावरील ३३ कोटी लोकांना १०० दिवसांत लसी देणे गरेजेचे आहे, असे मत उभय मान्यवरांनी व्यक्त केले.
सध्याच्या वेगाने ७५% लसीकरण पूर्ण होण्यास लागतील १० हून अधिक वर्षे
केंद्राला आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या लसींच्या मात्रा
सीरम इन्स्टिट्यूट
कोविशिल्ड १.१ कोटी
भारत बायोटेक
कोव्हॅक्सिन ५५ लाख
लोकसंख्येच्या ७५ टक्के लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास लागणारा कालावधी