Curreny News: तुमच्याकडेही आहेत का दोन हजार रुपयांच्या नोटा, आरबीआयने दिली महत्त्वपूर्ण माहिती, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 10:12 AM2022-11-11T10:12:50+5:302022-11-11T10:13:50+5:30
Curreny News: दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. सहा वर्षांपूर्व झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरात खूप काही बदललं होतं. देशभरात डिजिटल पेमेंट वेगाने वाढले आहे. यादरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटीबाबतही एक अपडेट समोर आली आहे.
नवी दिल्ली - दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. सहा वर्षांपूर्व झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरात खूप काही बदललं होतं. देशभरात डिजिटल पेमेंट वेगाने वाढले आहे. यादरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटीबाबतही एक अपडेट समोर आली आहे. बाजारात चलनामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा दिसण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. तसेच त्याबाबत आता रिझर्व्ह बँकेनेही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांपासून दोन हजार रुपयांच्या एकाही नोटीची छपाई झालेली नाही. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटीचा व्यवहारातील वापर नगण्य झाला आहे. आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांदरम्यान, दोन हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही.
रिझर्व्ह बँकेकडून सध्या बाजारामध्ये २ रुपये, ५ रुपये, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये, १०० रुपये, २०० रुपये, ५०० रुपये आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात जारी केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तसेच त्याऐवजी दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या.
देशभरात नव्या नोटा चलनात वापरण्यासाठी मिळाव्यात या उद्देशाने या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र आता बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर फारच कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत देशभरात चलनामध्ये असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांचा वाटा केवळ १३.८ टक्के एवढाच उरला आहे.
तसेच बनावट नोटांचा विचार केल्यास २०१८ मध्ये हे प्रमाण ५४ हजार ७७६ एवढे होते. सन २०१९ मध्ये हा आकडा ९० हजार ५६६ आणि २०२० मध्ये २ लाख ४४ हजार ८३४ एवढा राहिला.