डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं जेवण नाकारलं; झोमॅटोचं ग्राहकाला सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:00 PM2019-07-31T15:00:13+5:302019-07-31T15:00:43+5:30
ट्विटरवर अनेकांकडून झोमॅटोचं कौतुक
मुंबई: डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्यानं ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनीही ट्विट करत आपल्याला आयडिया ऑफ इंडियाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. आम्ही व्यवसाय करताना मूल्यं पाळतो, अशी भावना त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली. यामुळे सध्या ट्विटरवर गोयल आणि झोमॅटोचं कौतुक होत आहे.
अमित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीनं ट्विट करत आपण झोमॅटोवरुन केलेली ऑर्डर रद्द केल्याचं म्हटलं. 'त्यांनी (झोमॅटोनं) माझ्या ऑर्डरची जबाबदारी हिंदू नसलेल्या रायडरकडे दिली. रायडर बदलणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी ऑर्डर रद्द केल्यास भरलेले पैसे परत मिळणार नाहीत, असं ते म्हणाले. हाच डिलीव्हरी बॉय तुमच्याकडे जेवण घेऊन येईल, अशी सक्ती तुम्ही मला करू शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. तुम्ही पैसे परत करू नका. पण ऑर्डर रद्द करा,' असं ट्विट शुक्ला यांनी केलं.
Just cancelled an order on @ZomatoIN they allocated a non hindu rider for my food they said they can't change rider and can't refund on cancellation I said you can't force me to take a delivery I don't want don't refund just cancel
— पं अमित शुक्ल (@NaMo_SARKAAR) July 30, 2019
शुक्ला यांनी त्यांच्या ट्विटमध्ये झोमॅटोला टॅग केलं. या ट्विटला झोमॅटोनं केवळ दोन ओळींचा रिप्लाय केला. 'अन्नाला धर्म नसतो. अन्न हाच धर्म असतो,' अशा मोजक्या शब्दांमध्ये झोमॅटोनं अमित शुक्ला यांना प्रत्युत्तर दिलं. झोमॅटोच्या या ट्विटनं अनेकांची मनं जिंकली आहेत. अशा लोकांना योग्य शब्दांमध्ये सुनावल्याबद्दल तुमचं कौतुक वाटतं, अशा स्वरुपाची अनेक ट्विट्स यानंतर पाहायला मिळाली. धार्मिक कट्टरता जोपासणाऱ्या अशा ग्राहकांना ब्लॉक करुन अद्दल घडवा, अशी मागणीदेखील काहींनी ट्विटच्या माध्यमातून केली.
Food doesn’t have a religion. It is a religion. https://t.co/H8P5FlAw6y
— Zomato India (@ZomatoIN) July 31, 2019
We are proud of the idea of India - and the diversity of our esteemed customers and partners. We aren’t sorry to lose any business that comes in the way of our values. 🇮🇳 https://t.co/cgSIW2ow9B
— Deepinder Goyal (@deepigoyal) July 31, 2019
झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनीदेखील यावर ट्विट करुन स्वत:ला व्यक्त केलं. 'आयडिया ऑफ इंडियाचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या ग्राहकांची, भागिदारांची विविधता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या मूल्यांच्या आड येणारा व्यवसाय गमावल्याबद्दल आम्हाला दु:ख वाटत नाही,' असं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं.