सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांच्या विरोधातील सीव्हीसी चौकशी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 07:11 AM2018-11-11T07:11:03+5:302018-11-11T07:11:58+5:30
सीबीआयप्रमुखांविरुद्धचे आरोप : सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पदापासून दूर करणात आलेले सीबीआयप्रमुख आलोक वर्मा यांच्या विरोधात केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) केलेली चौकशी पूर्ण झाली आहे. के. व्ही. चौधरी, शरद कुमार आणि टी. एम. भशीन यांच्या तीन सदस्यीत समितीने दिवाळीची सुटी व अन्य सुट्यांतही काम करून ही चौकशी पूर्ण केली आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी करण्यात आली. चौकशीच्या वेळी पटनाईक हे सीव्हीसीच्या मुख्यालयात हजार होते. २६ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या चौकशीचे आदेश दिले. चौकशीसाठी सीव्हीसीला १४ दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत समितीने आपले काम केले आहे. आता सोमवारी, १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.
सूत्रांनी सांगितले की, वर्मा यांच्या विरोधातील आरोपांचीच समितीने चौकशी केली.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली नाही. अस्थाना यांना मेहश प्रसाद आणि सोमेश प्रसाद यांच्यामार्फत लाच दिल्याचा आरोप करणाऱ्या सतीश बाबू सना यास समितीने चौकशीसाठी बोलावले नाही. मोईन कुरेशी प्रकरणात दिलासा मिळावा यासाठी सना याने वर्मा यांना २ कोटी रुपये दिल्याचा आरोप आस्थाना यांनी केला होता. त्यानंतर अस्थाना यांना लाच दिल्याचा दावा सना याने केला होता.
सीव्हीसी आधीचा अहवाल फेटाळणार?
२२ आॅक्टोबरच्या रात्री सीव्हीसीने केलेल्या चौकशीत वर्मा यांना गैरवर्तणूक केल्याच्या आरोपाखाली दोषी धरले होते व कारवाईची शिफारसही केली होती. त्यानंतर २३ आॅक्टोबरच्या सकाळी सरकारने वर्मा यांना तातडीने बडतर्फ केले होते. २२ आॅक्टोबरच्या या चौकशीबाबत मात्र संशय व्यक्त करण्यात येत होता.
सीव्हीसी प्रमुख के. व्ही. चौधरी निष्पक्ष नसल्याचा आरोप करण्यात येत होता. न्यायालयाच्या नियंत्रणाखाली झालेल्या नव्या चौकशीत सीव्हीसी आधीचा अहवाल फेटाळते का, याकडे लक्ष आहे.